Pune Drugs: 50 तरुणांचा ग्रुप ड्रग्ज पार्टीसाठी हडपसरहून FC रोडला, रात्रीच्या अंधारात ड्रग्जचा खेळ; आतापर्यंत काय काय घडलं?
Pune Drugs : रात्री एक वाजेपर्यंत पब सुरु ठेवण्यास परवानगी असताना पाठीमागच्या दराने रात्री दीड वाजता पन्नास जणांना या पबमधे प्रवेश देण्यात आला . जिथे हा सर्व प्रकार घडला तिथली परिस्थिती ही अशी संशयास्पद आहे.

पुणे : पुण्यातील एफ सी रोडवरील (Pune FC Road) एल थ्री लाउंज मधील ज्या पार्टीत ड्रग्ज (Drugs Party) घेतल्याचा आरोप झालाय त्या पार्टीसाठी चाळीस ते पन्नास जणांचा ग्रुप हडपसरमधून आल्याचे समोर आले आहे. हडपसरमधील कल्ट नावाच्या पबमधे त्यांनी रात्री साडेबारा वाजेपर्यंत पार्टी केली आणि पुढे पाहाटेपर्यंत पार्टी करण्यासाठी ते एफ सी रोडवरील एल थ्री लाउंजमध्ये पोहोचले . त्यामुळं पोलीस आता त्या पन्नास जणांच्या ग्रुपचा शोध घेतायत . या प्रकरणात रविवारी दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचं निलंबन करण्यात आल्यानंतर सोमवारी आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. मात्र ड्रग घेणारे ते दोन तरुण कोण आहेत आणि त्यांच्याकडे ड्रग कुठून आलं याच उत्तर मात्र अजून मिळू शकलेलं नाही .
पुण्यातील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक असलेल्या एफ सी रोडवरील या लिक्विड लेझर लाउंज या पबमधे ड्रग्ज घेतलं जात असल्याचं उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत . पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत या हॉटेलचा , मालक , मॅनेजर , कर्मचारी आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तींसह आठ जणांना अटक केलीय. रात्री एक वाजेपर्यंत पब सुरु ठेवण्यास परवानगी असताना पाठीमागच्या दराने रात्री दीड वाजता पन्नास जणांना या पबमधे प्रवेश देण्यात आला . जिथे हा सर्व प्रकार घडला तिथली परिस्थिती ही अशी संशयास्पद आहे . पुणे L3 बार प्रकरणी आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
ड्रग्ज पार्टीसाठी हडपसरहून 50 जणांचा ग्रुप एफसी रोडला
या पार्टीमध्ये आलेले पन्नास जण शनिवारी संध्याकाळी हडपसरमधील कल्ट या पबमधे पार्टीसाठी जमले होते . रात्री साडेबारा वाजेपर्यंत त्यांनी कल्ट मध्ये पार्टी केल्यानंतर देखील त्यांचं मन भरलं नाही . त्यामुळं त्या पार्टीतील काहीजणांनी अक्षय कामठे या इव्हेन्ट मॅनेजमेंटच काम करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क केला . अक्षय कामठे आणि कल्ट पबमधील डी जे आदित्य मानकर या दोघांनी एल थ्री या पबमधे पार्टी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी एल थ्री चे मालक सचिन आणि संतोष कामठे या दोघांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर हा पन्नास जणांचा ग्रुप हडपसरहून एफ सी रोडच्या दिशेने निघाला. रात्री एक वाजता हा ग्रुप या एल थ्री लाउंजमध्ये येऊन पोहचला . त्यानंतर आणि रात्री दीड वाजता या ग्रुपची दुसरी पार्टी सुरु झाली जी पहाटे पाच वाजेपर्यंत चालली. याच कालावधीत या एल थ्री पबमधे ड्रग घेतल्याचा आरोप आहे .
पुण्यातील तरुणाईला पडलेला ड्रग्जचा विळखा समोर
हा व्हिडीओ समोर आणणाऱ्या पत्रकार अर्चना मोरेंनी ड्रग्ज सेवनाचे हे प्रकार या भागात नेहमीच घडत असल्याचा दावा केलाय . एफ सी रोडवरील या ड्रग प्रकरणानं लागलीच राजकीय वळण घेतलं असून विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलाय . तर सत्त्ताधाऱ्यांनी पुण्याची बदनामी सहन करणार नसून यामध्ये कोणालाही सोडणार नसल्याचं म्हटलंय. ललित पाटील प्रकरणामुळे पुण्यातील तरुणाईला पडलेला ड्रग्जचा विळखा समोर आला होता तर कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघातानंतर पब आणि बारचे दुष्परिणाम समोर आले होते . दोन्हीवेळी कारवाई केल्याचं दिसून आलं . मात्र एफ सी रोडवरील या प्रकरणामुळे या कारवाई किती तकलादू होत्या हे सिद्ध झालंय .
ड्रग्जचा विळखा सोडवणं , पब संस्कृतीतून तरुणाईला वाचवणं हे पोलिसांचं काम तर आहेच पण त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी या मुलांच्या पालकांची आणि शिक्षकांची आहे. त्यामुळं हा फक्त कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न न मानता सामाजिक प्रश्न आहे असं मानून पावलं उचलली गेली तरच आपण या समस्येच्या मुळापर्यंत पोहचू शकणार आहे.
Pune Drug Inside Story :
हे ही वाचा :
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप; बार मालकांवर आरोप करणाऱ्या रविंद्र धंगेकरांना मेधा कुलकर्णींनी सुनावले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
