Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे यांचा फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात (Santosh Deshmukh Murder Case) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आरोपी करण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढत होता. यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. 3 मार्चला संध्याकाळनंतर फोटो व्हायरल झाल्यानंतर 4 मार्च रोजी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. आता मंत्रिपदाची झूल जाताच धनंजय मुंडेंचा मानपानही गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडेंचा फोटो गायब झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) येत्या रविवारी नांदेडमध्ये येत आहेत. त्या निमित्ताने नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत वातावरण निर्मिती करण्यात आलीय. मात्र या बॅनरवरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना अजिबातच स्थान दिलेलं नाही. बॅनरवर मुंडे यांचा फोटो तर सोडाच साधा उल्लेख देखील कुठे दिसेनासा झालाय.
अजितदादांनी धनंजय मुंडेंना खड्यासारखं बाजूला केलं?
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनंजय मुंडे यांच्यापासून अंतर ठेवलंय की काय? अशी चर्चा रंगलीय. तसे पाहिलं तर नांदेड आणि परळीचे अंतर अत्यल्प आहे. त्यामुळे यापूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यक्रमात धनंजय मुंडे अग्रस्थानी असत. मात्र, संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना खड्यासारखे बाजूला केले की काय? अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पोस्ट
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला असल्याचे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

