Shivsena UBT: कोकणात उध्दव ठाकरेंना धक्का? स्नेहल जगताप सहकुटुंब सुनील तटकरेंच्या निवासस्थानी, रायगडच्या राजकारणात खळबळ
Snehal Jagtap Meet Sunil Tatkare: ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचं कुटूंब सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालं, त्यानंतर त्यांच्यामध्ये बंद दाराआड एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रायगड: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. अनेक पक्षाच्या नेत्यांनी ऐन निवडणुकीमध्ये पक्षांतर केलं. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर देखील पक्षांतर होत असल्याचं चित्र आहे. अनेक नेते सत्तेत असलेल्या पक्षांसोबत जात आहेत. अशातच महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला अखेरचा रामराम करत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती देऊन त्या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये त्या प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात रंगली आहे. याचंं कारण म्हणजे ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचं कुटूंब सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालं, त्यानंतर त्यांच्यामध्ये बंद दाराआड एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
जगताप कुटुंब आपल्या कार्यकर्त्यांसमवेत खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीमधील गीताबागमध्ये दाखल झालं त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. बंद दाराआड एक तासाहून अधिक वेळ नेत्यांमध्ये चर्चा झाली. लवकरच राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या तयारीची होणार घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्री पदावरून सुनिल तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात खटके उडाल्यानंतर सुनिल तटकरे यांची राजकीय खेळी सुरू झाल्याची देखील आता चर्चा आहे. महायुतीत नव्या वादाला वेगळं वळण मिळण्याची चर्चा आहे.
स्नेहल जगताप यांच्या भेटीवर तटकरेंची प्रतिक्रिया
स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश चर्चेनंतर खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्नेहल जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी आज सदिच्छा भेट घेत असल्याचं म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी यावर जास्त बोलणं टाळलं. माझी आणि जगताप कुटुंब यांची भेट ही केवळ नी केवळ सदिच्छा भेट होती. योग्य वेळ आल्यावर पुढील राजकीय निर्णय कळवू असं म्हणत सुनील तटकरे यांनी जास्त बोलणं टाळलं.
मातोश्रीवरुन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये विद्यमान मंत्री गोगावले यांचा पराभव होण्याची चिन्हे दिसत असतानाच अचानक माणगाव तालुक्यातून गोगावलेंना मिळालेल्या यशामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल माणिकराव जगताप यांचा 26,210 मतांनी पराभव झाला होता. पराभव झाल्यानंतर स्नेहल माणिकराव जगताप या नाराज झाल्या होत्या. त्यांची नाराजी मातोश्रीवरून दूर करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. मात्र, त्यामध्ये ठाकरेंच्या नेत्यांना यश आले नाही. त्यातच दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख पदावरील नियुक्तीमुळे देखील जगताप कुटुंब नाराज होते, त्यामुळे आता राजकीय वातावरण वेगळं होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत स्नेहल जगताप यांचा पराभव
माणिकराव जगताप यांची कन्या व महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात प्रवेश केला व विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत स्नेहल माणिकराव जगताप यांना 91,232 तर भरत गोगावले यांना 1,17,442 मते मिळाली. या निवडणुकीत 26,210 मतांनी गोगावले यांचा विजय झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

