Ban Chhava Movie: 'छावा' चित्रपटावर बंदी घाला, तरुणांची माथी भडकवली जातायत; मौलानांची अमित शहांकडे मागणी
Ban Chhava Movie: 'छावा' चित्रपटात मुघल बादशाह औरंगजेबाचं ज्यापद्धतीनं चित्रण केलंय, त्यामुळे तरुणांची माथी भडकवली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Ban Chhava Movie: 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) सध्या देश-विदेशात धुमाकूळ घालत आहे. पण, आता याच चित्रपटावरुन मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. 'छावा' चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहेत. नागपुरातील दंगलीला 'छावा' चित्रपट जबाबदार आहे, त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात मौलांना रझवी यांनी अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे.
'छावा' चित्रपटात मुघल बादशाह औरंगजेबाचं ज्यापद्धतीनं चित्रण केलंय, त्यामुळे तरुणांची माथी भडकवली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, मौलाना रझवी हे तेच आहेत, ज्यांनी काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटून मोहम्मद शमीवर रमझानमध्ये रोजा न ठेवल्याबद्दल टीका केली होती. तसेच, मोहम्मद शामीच्या मुलीनं होळी खेळल्याबद्दलही तिच्यावर टीका केली होती.
ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांवरही कायदेशी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
'छावा' चित्रपटात औरंगजेबाचं चित्रण ज्यापद्धतीनं करण्यात आलं, त्यावरून तरूणांची माथी भडकवली जात आहेत. ज्यामुळे अशांतता निर्माण होत असून नागपूरमध्ये दंगल उसळण्यास सदर चित्रपट कारणीभूत आहे, असं मौलाना रझवी यांनी म्हटलं आहे.
"छावा' चित्रपटामुळे नागपुरात दंगल"
उपराजधानी नागपूर शहरात दोन गटांत उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटल्याचं पाहायला मिळालं. औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन झालेल्या आंदोलनानंतर दोन गटांत तेढ निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत 34 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांकडून अद्यापही कारवाई सुरू असून या घटनेतली म्होरक्या किंवा मास्टरमाईंड फहिम खानला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. अशातच नागपूर हिंसाचारानंतर छावा सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या मौलानांकडून करण्यात आली आहे.
औरंगजेबाला मुस्लीम आदर्श मानत नाहीत
मौलाना रझवी पुढे म्हणाले, भारतातील मुस्लीम औरंगजेबाला आपला आदर्श किंवा नेता मानत नाहीत. आम्ही त्याला फक्त मुघल शासक मानतो, त्यापेक्षा अधिक काही नाही. तसेच नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी आवाहन केले होते. त्या परिसरातील उलेमा आणि इमाम यांना संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

