Nagpur Violence: दंगलखोरांच्या घरावर बुलडोझर चालवणार का, दगडफेक करणाऱ्या मुलांच्या पालकांवर कारवाई? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Nagpur Violence: नागपूरच्या महल, हंसापुरी आणि भालदारपुरा भागात दंगल उसळली होती. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. देवेंद्र फडणवीस मोदींच्या दौऱ्यापूर्वी नागपूरमध्ये.

नागपूर: नागपूर हिंसाचारात सहभागी असलेल्या दंगलखोरांवर आणि सोशल मीडियावरुन या दंगलीचा (Nagpur Riots) चिथावणी देणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. ज्या लोकांनी भडकावणारं पॉडकास्ट केलं, अफवा पसरवल्या, अशा सर्व लोकांवर कारवाई होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते शनिवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दंगलप्रकरणात अटक करण्यात आलेल्या 104 जणांमध्ये 12 विधिसंघर्षित मुलांचा समावेश असल्याचे सांगितले. मग या मुलांच्या पालकांवर कारवाई केली जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी म्हटले की, या सगळ्याचा तपास अजून सुरु आहे. पण विधिसंघर्षित बालकांवर जितके कठोर कायदे आहेत, त्याच्या कक्षेत राहून कारवाई केली जाईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. तसेच नागपूर हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात ज्याप्रकारे बुलडोझर कारवाई केली जाते, तशी करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करतो. जिथे बुलडोझर चालवायची गरज असेल तिकडे तो चालवला जाईल. जिथे चुकीचे काम होईल, ते चिरडून टाकले जाईल. कोणालाही सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही: देवेंद्र फडणवीस
नागपूरमध्ये सध्या ज्या भागांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत, त्या भागातील संचारबंदी आजपासून टप्याटप्याने उठवण्यात येईल. नागपूरमध्ये आता शांतता आहे. नागपूरमध्ये तो हिंसाचार झाला होता, तो शहराच्या एका भागात झाला होता. त्याचा बाकी नागपूरवर काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित नागपूर दौऱ्यात कोणताही बदल होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महिला कॉन्स्टेबलशी अभद्र व्यवहार झालेला नाही: फडणवीस
नागपूर हिंसाचारावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत दंगलखोरांनी अभद्र कृत्य केल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली होती. मी याबाबत पोलीस आयुक्तांना विचारले. त्यांनी सांगितले की, महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी कोणताही अभद्र व्यवहार झालेला नाही. मात्र, दंगलखोरांनी त्यांना घेरुन त्यांच्यावर दगडफेक केली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

