Devendra Fadnavis : नागपूरमध्ये पोलिसांनीच गाड्यांच्या काचा फोडल्या का? 'तो' गंभीर प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले...
Devendra Fadnavis : नागपूरमध्ये दंगलीवेळी पोलिसांनीच गाड्यांच्या काचा फोडल्या, असा आरोप केला जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय.

Devendra Fadnavis : नागपूरात औरंगजेबच्या कबर प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली होती. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत (Nagpur Violence) जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार आहे. आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर नागपूरमध्ये दंगलीवेळी पोलिसांनीच गाड्यांच्या काचा फोडल्या, असा आरोप केला जात आहे. यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणावर सविस्तर भाष्य केले आहे. नागपूरमध्ये पोलिसांनीच गाड्या फोडल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा अशा प्रकारची धावपळ असते, त्यावेळेस पोलीस देखील हातात काठ्या घेऊन मागे पळत असतात, एखादा दांडा कुठे मारतात, पोलिसांनी गाड्या फोडल्या, असे म्हणणे योग्य होणार नाही. मला असे वाटते की, किमान या बाबतीत तरी पोलिसांना विनाकारण टार्गेट करणे अतिशय चुकीचे होईल. पोलिसांनी यात नीट काम केलेले आहे. पोलिसांनी देखील मार खाल्ला आहे. आपण यात पोलिसांची बाजू घ्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.
फडणवीसांची काँग्रेसच्या समितीवर टीका
नागपूरच्या तणावग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समिती नेमून ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची समितीने नागपूरात जाऊन दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. याबाबत विचारले असता ज्याच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे. दंग्याचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य आहे म्हणजे दंगेखोर हे दंग्याची चौकशी करण्याकरता जर येणार असतील तर हे समिती म्हणजे अक्षरशः लांगुलचालन आहे, पाय चाटणे आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार
दरम्यान, नागपूर दंगल प्रकरणात पोलिसांनी चार-पाच तासांत दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या सगळ्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, लोकांना मोबाईलवर केलेले चित्रीकरण याआधारे दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. ज्या लोकांचं नुकसान झाले आहे, गाड्या फुटल्या आहेत, त्यांना येत्या तीन-चार दिवसांत नुकसान भरपाई मिळेल, असे त्यांनी म्हटले. तर नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Nagpur Violance : नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

