Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
Nagpur violence Fahim Khan: नागपूर हिंसाचार प्रकरणात प्रक्षोभक मजकूर पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर महाराष्ट्र सायबर सेलकडून कारवाई करण्यात आली आहे.

नागपूर: नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीच्या शहराध्यक्ष फईम खानला अटक झाली आहे. मात्र, मायनॉरिटिज डेमोक्रॅटिक पार्टीने नागपुरात झालेल्या हिंसेशी आमच्या पक्षाचा आणि कुठल्याही पदाधिकारीचा कुठलाही संबंध नसल्याचा दावा करत फईम खानचा जोरदार बचाव केला आहे. मात्र, पक्षाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाविषयी आणि त्याच्याशी औरंगजेबाच्या संबंधाबद्दल काही प्रश्न उपस्थित करत औरंगजेबाला त्यांच्या हत्येसाठी थेट जबाबदार मानण्यास नकार दिले आहे. उलट औरंगजेब भारतात अनेक चांगल्या कामांचा जनक असून अखंड भारताचा निर्माता असल्याचा अजब दावा मायनॉरिटिज डेमोक्रॅटिक पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांनी केला आहे.
मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीकडून नेमकं काय सांगण्यात आले?
* फईम खानचा हिंसाचाराशी संबंध नाही. आमचा विरोध फक्त विहिंप कडून जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली, त्यावरील कापडावर आमच्या धार्मिक भावनाशी निगडीत लिखाण असल्याने त्यास आम्ही विरोध केला.
* मुख्यमंत्र्यांनी जारी विधिमंडळात विहिंपला क्लीन चिट देत जरी सांगितलं असेल की त्या कापडावर कुठेही धार्मिक गोष्टी लिहिलेल्या नव्हत्या, तरी आमचा विश्वास नाही, त्यांची प्रशासनाने दिशाभूल केली आहे.
* गणेश पेठ पोलीस स्टेशन असो किंवा शिवाजी चौक असो आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याने औरंगजेबच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या नाही.
* आम्ही गणेश पेठ पोलीस स्टेशन वर फक्त सात ते आठ लोकांसह गेलो होतो. मात्र, सोबत जनतेमधील काही लोक आले आणि त्यांनी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणा दिल्या असतील.
* औरंगजेबशी आमचा काय देणंघेणं?? मात्र, औरंगजेब एक बादशाह होता, त्याने अखंड भारत निर्माण केला, त्यांनी हिंदूंचा पवित्र कैलाश पर्वत भारतात आणला.
* आम्ही औरंगजेबच्या चांगल्या कामांचा समर्थन करतो. त्याच्या चुकीच्या कामाशी आमचं देणंघेणं नाही.
* छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ज्याने कोणी केली, त्याने खूप चुकीचे काम केले. जर छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबने मारले, तर ते चुकीचे काम होते. जर संभाजी महाराजांची हत्या इतर कोणी केली असेल, तर मग औरंगजेब दोषी कसा??
* औरंगजेबने तर शाहू महाराजांचे पालन पोषण केले, जर संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली असती, तर त्याने शाहू महाराजांचा पालनपोषण का केलं असतं??
* शिवाजी महाराजांना औरंगजेबाने माफ केलं होतं असंही इतिहासात आहे.
* संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज महाराष्ट्राची शान आहेत यांची जो कोणी बदनामी करेल तो देशविघातक काम करत आहे.
* नागपुरात औरंगजेबच्या समर्थनार्थ ज्यांनी घोषणा दिल्या तो आमच्या पक्षाशी संबंधित नाही. आम्ही औरंगजेबच्या अखंड भारताचा आणि इतर चांगल्या कामाचा समर्थन करतो. मात्र, त्याशिवाय आमचं देणंघेणं नाही.
* नागपुरात झालेली हिंसा आम्ही केलेली नाही. आमच्या पक्षाची कुठलीही भूमिका त्यात नाही. जर पोलिसांकडे पुरावा असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करू.
* नागपूर हिंसाचार प्रकरणी फईम खान दोषी निघणार नाही, आमचा त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे. जर तो दोषी निघाला तर आम्ही त्याला पक्षातून काढून टाकू.
* आमच्या पक्षाची शक्ती वाढत आहे. बजरंग दल सारख्या संघटनांना रोखण्याचा काम आम्ही केला आहे. म्हणून ओवेसी सारख्या अनेकांना पोटदुखी होत आहे. आम्ही ओवेसीसारखे दलाल नाही.
* महाल परिसरात जी हिंसा झाली, त्यासाठी नक्कीच बाहेरून काही लोक आले असतील. ज्यांना पोलिसांनी आरोपी बनवले आहे, त्यांचा खरोखर सहभाग असेल तर त्याची सखोल चौकशी करावी. मात्र आम्हाला वाटतंय बजरंग दल च्या लोकांनी ही हिंसा पसरविली आहे. या कटात पोलीसही सहभागी आहे.
* त्यामुळे हिंसेच्या या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्यात यावी.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

