Disha Salian Case: दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे. यामुळे एकच खबाल उडाली आहे.

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची (Disha Salian Death Case) नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिच्या आई-वडिलांनी केलीय. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक चौकशी करा अशी मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे. त्यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. आता दिशाच्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी याचिका दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दिशावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करतानाच या प्रकरणात आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, एकता कपूर, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, शोविक चक्रवर्ती, आदित्यचे सुरक्षा रक्षक हिमांशू शिक्रे या सर्वांचे 3 ते 20 ऑगस्ट 2020 चे कॉल रेकॉर्ड चेक करा, टॉवर लोकेशनही तपासून घ्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
या प्रकरणाचा खटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिशा सालियनच्या पोस्ट मॉर्टमचा व्हिडिओ कोर्टाला सादर करावेत, दिशाच्या इमारतीचं 3 ते 10 जूनचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला द्यावे. सतीश सालियन यांची मुलाखत घेण्यापासून मीडियाला रोखावं. आतापर्यंत झालेली चौकशी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. CBI आणि NIA कडून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, या प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणी देखील सतीश सालियान यांनी केली आहे.
किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप
तसेच दिशा सालियनच्या वडिलांनी या याचिकेत किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकरांनी सालियन कुटुंबावर दबाव टाकला. नितेश राणे, नारायण राणेंवर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकला. किशोरी पेडणेकरांनी साक्षीदारांना जबाब न नोंदवण्यासाठी धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, दिशा सालियनचा इमारतीच्या छतावरून पडून 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. दिवगंत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची दिशा सालियन ही मॅनेजर होती. सुशांतच्या आत्महत्येच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 8 जून 2020 ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पण या प्रकरणी अनेक आरोप आणि प्रत्यारोप झाले आहेत. भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशाची हत्या झाली असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. आता दिशाच्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी याचिका दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

