Prashant Koratkar : फरार प्रशांत कोरटकरविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी, कुठे-कुठे प्रवास केला याची माहिती घेणार
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिस नागपूरमध्ये ठाण मांडून असले तरी त्यांना नागपूर पोलिसांकडून सहकार्य केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. अशात आता प्रशांत कोरटकर देश सोडून गेल्याची चर्चा आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरविरोधात (Prashant Koratkar) लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. तसंच ब्युरो ऑफ इमिंग्रेशनकडून कोरटकरने कुठे कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली जात आहे. प्रशांत कोरटकर फरार असून तो देश सोडून दुबईला गेल्याची चर्चा आहे.
नागपूरच्या प्रशांत कोरटकरने कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या तक्रारीनंतर कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण 25 फेब्रुवारीपासून कोरटकर फरार असून त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा नाही. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा असून त्याला पुष्ठी देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्चला फेटाळला गेला. अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. पण आता तो देश सोडून गेल्याची चर्चा आहे.
विरोधकांकडून टीकेचा आसूड
कोटरकर प्रकरणी खासदार संजय राऊतांनी नागपूरच्या पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी खासदार राऊतांनी केली. संशयित आरोपीने देश सोडून जाणं गंभीर असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तर पोलिसांनीच कोरटकरला पळायला मदत केली असेल असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. महाराजांचा अपमान करणारा विकृत माणूस देशातून पळून जातो, कारण फडणवीसांनी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पुरस्कार द्यायचं ठरवलंय अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
प्रशांत कोरटकर दुबईला जावो की कुठेही जावो, पोलीस त्याला शोधून काढतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रशांत कोरटकरचा पासपोस्ट जप्त करा अशी मागणी करत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये अर्ज केला आहे. कोरटकरच्या कथित पलायनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हा अर्ज दाखल केला.
प्रशांत कोरटकर प्रकरणात एबीपी माझाचे प्रश्न
1. एक महिना होत आला, प्रशांत कोरटकरला धमकी प्रकरणात अटक का नाही?
2. प्रशांत कोरटकर महाराष्ट्र पोलिसांपेक्षाही मोठा आहे का?
3. प्रशांत कोरटकरला अटक होऊ नये यासाठी पोलीसच प्रयत्नशील आहेत का?
4. कोरटकरला अटक न करण्यानं पोलिसांची बदनामी होत नाही का?
5. खरंच,प्रशांत कोरटकरला कुणी पाठीशी घालतंय का?
6. कोरटकरला अटक करु नये असे वरिष्ठांचे पोलिसांना निर्देश आहेत का?
7. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतची मैत्री कोरटकरला फायद्याची ठरतेय का?
8. कोरटकरसारख्या 'चिल्लर'व्यक्तीचा ठावठिकाणा लागू नये एवढे पोलीस निष्क्रिय आहेत का?
10. प्रशांत कोरटकरला कधीच अटक होणार नाही का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

