युवक काँग्रेसमधील वाद संपता संपेना! प्रदेशाध्यक्षाविरोधात भाष्य भोवलं; पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं प्रकरण काय?
Nagpur News : नागपुरात युवक काँग्रेसने पुकारलेल्या आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते न आल्यामुळे फज्जा उडालेल्या आंदोलनाचा वाद संपता संपत नसल्याचे पुढे आले आहे.

Nagpur News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी युवक काँग्रेसने पुकारलेल्या आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते न आल्यामुळे फज्जा उडालेल्या आंदोलनाचा वाद संपता संपत नसल्याचे पुढे आले आहे. युवक काँग्रेसच्या तेव्हा पदमुक्त करण्यात आलेल्या ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात आवाज उचलला होता, त्या सर्वांना युवक काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे युवक काँग्रेस मधील हा वाद पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्षाविरोधात भाष्य भोवलं, पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी
युवक काँग्रेसमधून उचलबांगडी करण्यात आलेल्यांमध्ये उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, सरचिटणीस अनुराग भोयर, सरचिटणीस अक्षय हेटे, तसेच रामटेक लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे या चौघांचा समावेश असून त्यांची आता युवक काँग्रेस मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चौघांनीच प्रसार माध्यमांसमोर येऊन कुणाल राऊतच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. कुणाल राऊत रात्री लोकांवर कारवाई करतात आणि सकाळी कारवाई मागे घेतात, असा सूचक आरोप ही या चौघांनी केला होता. परिणामी आता या प्रकरणी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या राम मंदिरावरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नागपुरात युवक काँग्रेसने आंदोलन केलं होतं. मात्र अचानक पुकारलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र पक्षातील अनेकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती. परिणामी अवघ्या 50 ते 60 कार्यकर्त्यांसोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना काँग्रेसच्या कार्यालयावरून संघ मुख्यालयाकडे निघण्याची वेळ आली होती. तर युवक काँग्रेसचे हे आंदोलन फसल असल्याचेही बोललं गेल्याने गैरहजर राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तडकाफडकीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील 60 पदाधिकाऱ्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आल्याने संतप्त झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी मध्यमांसमोर येत आपली कैफियत मांडली. शिवाय कुणाल राऊत यांच्या काळात संघटन निष्क्रिय झाल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला होता. त्यातीलच चौघांना आता युवक काँग्रेस मधून कायमचे काढण्यात आले आहे. त्यामुळे युवक काँग्रेस मधील हा वाद पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
