Palghar : पालघर जिल्ह्यात स्थलांतराची गंभीर समस्या, रोजगार नसल्यानं भटकंती, मुलांचं नुकसान
पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर होणारी भात शेती इतकाच काय तो एक उदरनिर्वाहाचा पर्याय असल्याने दिवाळी सणानंतर येथील हजारो कुटुंब आपल्या चिमुकल्या मुलांसह शहराची वाट धरतात.
Palghar News: मुंबई , ठाणे , नाशिक या महानगरांना लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही रोजगार नसल्याने येथील हजारो कुटुंब स्थलांतरित होतात. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर होणारी भात शेती इतकाच काय तो एक उदरनिर्वाहाचा पर्याय असल्याने दिवाळी सणानंतर येथील हजारो कुटुंब आपल्या चिमुकल्या मुलांसह शहराची वाट धरतात. रोजगारासाठी होणारं हे स्थलांतर रोखण्यासाठी सरकार आणि शासन अनेक उपययोजना करतं मात्र या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचं चित्र आहे.
डहाणू या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या 13 ते 14 किलोमीटर वरती असलेला गंजाड येथील हा दसरा पाडा. या पाड्यातील बहुतांशी कुटुंब कातकरी समाजाची. गावातील कुटुंबांची संख्या 285च्या घरात. मात्र सध्या या गावात मोजक्या काही घरांमध्ये लोक राहत असल्याचं चित्र आहे. 285 पैकी 220 पेक्षाही जास्त कुटुंब सध्या गाव सोडून महानगरांकडे स्थलांतरीत झाली आहेत. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने दरवर्षी येथील कुटुंब आपल्या मुलां बाळांसह शहराची वाट धरतात. त्यामुळे हा दसरा पाडा आता ओस पडला आहे. अनेक घर आपल्याला बंद असलेली दिसून येतात. ऑक्टोबरमध्ये रोजगारासाठी गावाबाहेर पडलेली ही कुटुंब आता थेट मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा आपल्या गावाकडे येतील.
मुलांचं शैक्षणिक नुकसान
कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगारच मिळत नसल्याने ही कुटुंब दरवर्षी मुंबई, ठाणे , नाशिक या महानगरांमध्ये स्थलांतरित होतात. या महानगरांमध्ये गेल्यावर हाताला मिळेल ते काम करून ही कुटुंबं आपला उदरनिर्वाह करतात. सात ते आठ महिने स्थलांतरित झाल्यावर येथील शाळेत जाणाऱ्या मुलांचं ही मोठं शैक्षणिक नुकसान होतं. दिवाळी नंतर कुटुंबासोबत जाणारी चिमुकली मुलं आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडतात.
सध्या दसरापाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारी 20 मुलं आपल्या आई वडिलांसोबत स्थलांतरित झाली असून डिसेंबरच्या अखेरपर्यंत शाळा सोडणाऱ्या मुलांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रोजगारासाठी होणार स्थलांतर हा गंभीर प्रश्न असून हे स्थलांतर रोखण्यासाठी शासन आणि सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र या योजनांचा पुरेपूर फायदा येथील तळागाळातील गरजू कुटुंबांना झालेला आजही दिसून येत नाही. त्यामुळे रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतराचा आकडा कमी होताना दिसत नसून रोजगार हमी योजना, स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगारासाठी दिल जाणार कर्ज या योजनांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय. आजही पालघर जिल्ह्यातील हजारो कुटुंब ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात शहरांकडे स्थलांतरित होणारी ही कुटुंब थेट पाऊस सुरू होण्याच्या अगदी काही दिवस आधी आपल्या घराकडे वळतात.
ग्रामीण भागातून होणार स्थलांतरण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र या भागातील नागरिक रोजगारासाठी आगाऊ पैसे उचलत असल्याने ही समस्या जैसे थै च असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पालवे यांनी सांगितलं आहे. तसंच ग्रामीण भागातील बेरोजगारांनी जॉब कार्ड तयार करून घ्यावे असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
ही बातमी देखील वाचा