Nashik News : भरल्या घरात दुःखाचा डोंगर! शेततळ्यात बुडून ग्रामपंचायत महिला सदस्याचा मृत्यू, सिन्नरची घटना
Nashik News : सिन्नर तालुक्यातील मीठ सागरे येथील ग्रामपंचायत सदस्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Nashik News : पुण्याच्या खडकवासला (Khadakwasala) धरणात बुडून दोन मुलींचा करुण अंत झाल्याची घटना घडली. याचबरोबर रोजच तलावात, विहिरीत, धरणांत बुडून मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यातील मीठ सागरे येथील महिलेचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सिन्नर (Sinnar) तालुक्यातील मीठसागरे येथील 32 वर्षीय ग्रामपंचायत सदस्या नंदा योगेश चतुर (Nanda Chatur) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नंदा चतुर या स्वतःच्या शेततळ्यात पाणी भरण्यासाठी पाईप टाकत असताना त्यांचा तोल जाऊन पाय घसरला. आणि त्यांना शेततळ्यातून बाहेर पडता न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितले. सकाळी लवकर उठून नंदा चतुर या शेततळ्याकडे गेल्या असल्याचे सांगण्यात आले. त्या घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर नंदा यांच्याबरोबर अघटित घडल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश दिलीप चतुर यांनी या घटनेसंदर्भात वावी पोलिसांना (Vavi Police) कळविले. त्यानुसार सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास झोपेतून ऊठलो. त्यावेळी शेतात उसाला पाणी भरणे चालु होते. शेतात उसाचे बारे वळविण्यासाठी पत्नी नंदा ही गेलेली होती. त्यानंतर शेताकडे गेलो. परंतु नंदा दिसली नाही. तेव्हा आजुबाजुला तिचा शोध घेतला असता कुठेच आढळून आली नाही. शेवटी आमचे शेजाऱ्यांनी नंदा ही शेतातील शेततळ्यात पडली असल्याचे सांगितले. याबाबत माहिती दिल्यानंतर सर्वजण तळ्यावर गेलो. तेव्हा संदीप शशिकांत चतुर, संतोष संजय चतुर, समाधान चांगदेव कथले, योगेश अरुण चतुर यांच्या मदतीने शेततळ्यातील पाण्यातुन बाहेर काढले.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड ....
दरम्यान पती योगेश चतुर यांनी याबाबत वावी पोलीस ठाण्यात कळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, हवालदार दशरथ मोरे, सोमनाथ इल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सिन्नर येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मीठसागरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नंदा चतुर या सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. सरपंचपद महिला राखीव असल्याने रोटेशनप्रमाणे त्यांना देखील सरपंच पद भूषवण्याची संधी मिळणार होती. मात्र पूर्वीच काळाने घाला घातला. त्यांचे पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
