(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar : चेंबरमध्ये उतरलेले कामगार पाण्यात बुडाले; दोघांचा मृत्यू तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक
Chhatrapati Sambhaji Nagar : चेंबरमध्ये बुडालेल्या चौघांपैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला असून इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून, चेंबरचे काम करताना चार जण बुडाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील सलीम अली सरोवर परिसरातील मलजल प्रक्रिया केंद्र येथे ही घटना घडली आहे. तर चेंबरमध्ये बुडालेल्या चौघांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून, इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर घटनेची महिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनी घाटी परिसरात धाव घेतली. अंकुश बाबासाहेब थोरात (वय 32 वर्षे, हिमायत बेग भिमराज नगर), रावसाहेब सदाशिव घोरपडे (वय 33 वर्षे, रा. हिमायत बेग भिमराज नगर) असे मृत कामगारांचे नावं असून, विष्णू उगले (रा. हिमायतबाग) आणि बाळू विश्राम खरात यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबरमध्ये बुडालेले चारही जण मोल मजुरीचं काम करायचे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम मिळत नव्हते. अशात शहरातील मलजल प्रक्रिया केंद्र परिसरात असलेल्या चेंबरचे काम असल्याचे त्यांना कळाले होते. दरम्यान काम मिळाल्याने ते सर्वजण मलजल प्रक्रिया केंद्र परिसरात कामावर गेले. दरम्यान काम करता असतानाच यातील एक जण चेंबरमध्ये बुडाला असल्याचे त्याच्यासोबत असलेल्या इतर कामगारांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी दुसरा आतमध्ये गेला, पण तो देखील आतमध्ये बुडाला. दोघेजण आतमध्ये बुडत असल्याचे पाहून आणखी दोघेजण त्यांना वाचवण्यासाठी आतमध्ये गेले, पण ते देखील पाण्यात बुडाले.
डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले
एकामागून एक असे चारजण चेंबरच्या पाण्यात बुडाल्याचे इतर सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी अराडाओरड करून त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्या चौघांना तात्काळ शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यापैकी दोघांना मृत घोषित केले. तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. तसेच या याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर यातील मृत अंकुश थोरात यांना तीन मुलं आहेत. तर रावसाहेब घोरपडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या विष्णू उगले यांना चार मुलं आणि बाळू खरात यांना दोन मुलं, एक मुगली आहे.
नातेवाईकांची सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर गर्दी
चेंबरच्या पाण्यात काही कामगार बुडाले असल्याची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान कामगारांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शासकीय घाटी रुग्णालयामध्ये धाव घेतली. यावेळी हिमायत बाग येथील नागरिक आणि नातेवाईकांनीही घाटी रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. दरम्यान काही नातेवाईकांनी सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढत, अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: