Nashik News : पाण्यापायी महिलांच्या डोळ्यात पाणी..., नाशिक जिल्ह्यात 55 गावांना टँकर, अशी आहे धरणांची स्थिती
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ महिलांवर आल्याचे चित्र आहे.
Nashik News : एकीकडे नाशिक (Nashik) शहराचे जिल्ह्यातील तापमान वाढत असताना दुसरीकडे पाण्याचे संकट देखील आ वासून उभे आहे. जिल्ह्यातील पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ महिलांवर आल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील जवळपास 41 गावे व 19 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर पंधरा विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बहुतांश वाड्यावर त्यांना पाणीटंचाईचा (Water Crisis) सामना करावा लागत असून दोन दोन तीन किलोमीटर जाऊन झिर्यावरून पाणी आणण्याची वेळ महिला वर्गावर येऊन ठेपली आहे. अशातच मेच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणसाठा 36 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 55 गावे व 19 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा (Water Supply) करावा लागत आहे. तर पंधरा विहिरी अधिग्रहित करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांत पाणी टंचाईच्या गर्तेत सापडणाऱ्या गावांची संख्या वाढत असून अल निनोच्या प्रभावाने पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन केले जात आहे. पुढील महिन्यात पुन्हा जलसाठ्याचा आढावा घेऊन जिल्ह्यातील पाणीसाठ्याचा नियोजन करण्यात येणार आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात प्रारंभी अवकाळी पाऊस गारपीट व ढगाळ हवामानामुळे उन्हाची तीव्रता (Temprature) फारशी जाणवली नव्हती. मात्र मे महिना त्याचा अपवाद ठरला. याच काळात जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. सध्याच्या तापमानाचा पारा चाळीशीच्या जवळपास सरकला असताना ग्रामीण भागात पाणीटंचाईची धग जाणवत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे. विहिरींनी तळ गाठला असून महिला वर्गांना दोन किलोमीटर पायपीट करून झेऱ्यावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
अशी आहे टँकरची संख्या....
दरम्यान पाणीटंचाईची सर्वाधिक झळ येवला (Yeola) तालुक्यात बसत असल्याचे चित्र प्रशासनाच्या माध्यमातून समोर आले आहे. या तालुक्यातील 25 गावे व नऊ वाड्यांना आजच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात सात गावे व आठ वाड्यांना आठ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बागलाण तालुक्यातील गावात दोन टँकर, चांदवडमध्ये पाच गावे तीन टँकर, देवळामध्ये एक टँकर अशी स्थिती असल्याचे समोर आले आहे. तर सुरगाणा तालुक्यात 2 टँकर, पेठ तालुक्यात 3 टँकर सुरु आहेत. सध्या जिल्ह्यातील जवळपास 70 हजार लोकसंख्येच्या गावांना 42 टँकरद्वारे पाणी दिले जात आहे यामध्ये शासकीय व 22 खाजगी टँकरचा समावेश आहे जर पावसाळा लांबल्यावर पडल्यास टंचाईचा संकटात सापडणाऱ्या गावांची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
धरणांतील जलसाठा
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा पहिला असता आठ धंदांमध्ये धरणांमध्ये 20 टक्क्यांहूनही कमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या 24 धरणांमध्ये सध्या 36 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी धरणांमध्ये 35 टक्के जलसाठा होता. यावर्षी पाऊस उशिराने दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत धरणातील पाणी पुरवठ्याचे फेरनियोजन केले जात आहे. दरम्यान माणिकपुंज हे धरण कोरडे ठाक झाले असून नागासाक्या, गौतमी गोदावरी, कश्यपी, तिसगाव, भोजापुर, वाघाड, पुणे गाव, आळंदी या आठ धरणांमधील जलसाठा चार ते 20 टक्क्यांच्या दरम्यान आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या 47 टक्के जलसाठा आहे.