Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Vicky Kaushal Chhava: विक्की कौशल 'छावा' मध्ये दिसणार आहे. रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.

Vicky Kaushal Chhava: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना यांच्या आगामी 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 14 फेब्रुवारीला 'छावा' चित्रपट संपूर्ण देशभरात रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर ट्रेलर प्रदर्शित होताच, प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं. अशातच सध्या रश्मिका आणि विक्की देशभरात चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. तसेच, आगामी 'छावा' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी एबीपी न्यूजशी संवाद साधला. यावेळी बोलताना विक्कीनं सांगितलं की, ज्यावेळी 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, त्यावेळी मी सर्वात आधी तो माझ्या आईला दाखवला.
'छावा'च्या ट्रेलरबाबत विक्कीला आलेलं टेन्शन
एबीपी न्यूजशी बोलताना विक्की आगामी 'छावा' चित्रपटाबाबत भरभरुन बोलला. त्यानं चित्रपटासाठी घेतलेली मेहनत, काही आठवणी शेअर केल्या. त्यावेळी त्यानं सांगितलं की, "ज्यावेळी मला ट्रेलर मिळाला, त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. कसा असेल? एवढी मेहनत घेतलीय? सगळं ठीक होईल ना? माझ्याकडे रात्री 1 वाजता आलेला ट्रेलर. मी फोन थेट जाऊन देवघरात ठेवला आणि प्ले बटन दाबलं. मी मनात म्हणत होतो की, देवा, काळजी घे... मी खूप मेहनत घेतली आहे. मला माहीत नाही ट्रेलर काय आहे... तूच पाहून घे... मी सर्वात आधी ट्रेलर असा पाहिला. मग जेव्हा मी ट्रेलर पाहिला, तेव्हा मला ट्रेलर ठिक वाटला. मग मी तो माझ्या आईला दाखवला. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. पप्पा, कतरिना सर्वांना ट्रेलर खूप आवडला. प्रेक्षकांनीही प्रेम दिलं. त्यामुळे आता फिल्मसाठीही चांगलीच अपेक्षा आहे."
रश्मिका मंदानानं 'छावा'बाबत बोलताना सांगितलं की, तिची सर्वात मोठी क्रिटिक तिची टीम आहे. ती म्हणाली की, "कारण घरात मी माझ्या कामाबाबत फारशी चर्चा करत नाही. मी घरात सेलिब्रिटी नाही, तर नॉर्मल मुलगी आहे. बाहेर मात्र मी कामावर जाते आणि अभिनेत्री, सेलिब्रिटी आहे. मला असं वाटतं की, मी दोन वेगळी आयुष्य जगते. एका व्यक्तीसाठी हे सर्वकाही अवघड आहे. पण, फिमेलसाठी सोपं आहे. माझी टीम माझी सर्वात मोठी क्रिटिक आहे. त्यांना आवडलं नाहीतर, ते मला सांगतात आणि आवडलं तरीसुद्धा सांगतात."
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'छावा'
ट्रेलर रिलीज झाल्यानंतरही 'छावा'मध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवरुन तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्मात्यांना इतिहासाशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करू नका असा सल्ला दिला होता. या दृश्यात, छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या राज्याभिषेकानंतर राणी येसूबाईंसोबत लेझीम खेळतानाची दृश्य दाखवण्यात आली होती. जी काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी प्रेक्षकांची मागणी मान्य करत, लगेचच बदल करण्यास सकारात्मकता दाखवली आणि बदल केले जातील, असा शब्द दिला.
पाहा व्हिडीओ : 'छावा'निमित्त विक्की कौशल, रश्मिका मंदानाची ABP न्यूजशी बातचित
महत्त्वाच्या इतर बातम्या :























