(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : शिंदे गटाच्या संपर्क प्रमुखाला नागपूर महानगरपालिकेची नोटीस; जागेच्या मालकीबाबत प्रश्न प्रलंबित, मात्र व्यवसाय जोरात
जागेची मालकी कोणाची हा वाद कायम असल्याने कोणीच मालमत्ता कराचा भरणा करीत नाही. मात्र मालकी स्पष्ट नसताना मनपामार्फत भाडेकरूंना कशाच्या आधारावर नोटीस पाठवली जाते असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
Nagpur News : नागपुरातील फुटाळा तलावाजवळील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवरील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या कॅफेच्या अतिक्रमणाचा मुद्दा गाजत असताना महापालिकेने आता रामदासपेठेच्या शेजारी असलेल्या काचीपुऱ्यातील अतिक्रमित जागेवर दुकाने, लॉन, सावजी, हॉटेल थाटलेल्या तसेच भाडेकरूंना नागपूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. जागेच्या मालकीबाबत वाद सुरु असताना या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि कॅफेच्या माध्यमातून व्यवसाय मात्र जोरात सुरु आहे, हे विशेष. दुसरीकडे बाजाजनगर पोलिस ठाण्यामार्फतही काही लोकांची चौकशी केली जात असल्याचे समजते. नोटीस बजावलेल्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नागपूरचे संपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांचाही समावेश आहे.
काशीकर यांनी येथे तीन गाळे भाड्याने घेतले आहेत. मालमत्ता कर महापालिकेशी (NMC) संबंधित असताना बजाजनगर पोलिस विचारपूस करत असल्याने दुसऱ्याच कोणावर तरी निशाणा साधला जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ही जागा आमच्या मालकीची असल्याचा दावा काचीपुऱ्यातील शेतकऱ्यांचा आहे, तर दुसरीकडे शासनाच्या लेखी कृषी विद्यापीठाची ही जागा आहे. जागेचा वाद अनेक वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे. अलीकडे या जागेवर मोठ मोठे लॉन आणि हॉटेल उघडण्यात आले आहेत. शहराच्या अगदी मधोमध ही जागा असल्याने व्यावसायिकांचाही यावर डोळा आहे.
येथील व्यावसायिकांकडून महापालिकेतर्फे मालमत्ता कर वसूल केला जात आहे. दरवर्षी मार्च महिना जवळ येताच महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे नोटीस बजावली जाते. वासवी लॉनसह अनेकांकडे सुमारे 60 ते 70 लाखांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. या जागेची मालकी कोणाची हा वाद अद्याप कायम असल्याने कोणीच मालमत्ता कराचा भरणा करीत नाही. मालकी कोणाची हेच स्पष्ट नसताना महापलिकेमार्फत भाडेकरूंना कशाच्या आधारावर नोटीस पाठवली जाते असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मालकीबाबत अनेक प्रश्न प्रलंबित
महापालिकेच्या धरमपेठ झोनच्यावतीने शिंदे सेनेचे शहर संपर्क प्रमुख मंगेश काशीकर, माने किचन या भाडेकरूंना 5 जानेवारीला नोटीस बजावून तुमच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तीन दिवसात माहिती सादर करण्यास सांगितले आहे. विक्रीपत्राची प्रत, अद्यावत कर पावती, बांधकामाची मंजुरी, नकाशा, आखिव पत्रिका आदी सादर करण्यास सांगितले आहे. मुळात जागेच्या मालकाचा पत्ता नसताना भाडेकरू कोणी ठेवले, त्याचे भाडे कोण घेते आणि अनधिकृत बांधकाम कोणी केले हे प्रश्न समोर आले आहे. महापालिकेने जी कागदपत्रे सादर करण्यास सांगितली आहे. ती मूळ मालकाला मागणे अपेक्षित आहे. भाडेकरूंकडे फक्त मालकासोबतचा भाडेकरार असतो.
ही बातमी देखील वाचा...