(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : नागपुरात दुचाकीसह 20 फूट खड्ड्यात पडल्याने निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू; मोबाईल लोकेशनच्या मदतीने सापडला मृतदेह
Nagpur : पांचू भट्टाचार्य सायंकाळपर्यंत शेतात आले नाही. त्यांच्या मोबाइलवर वारंवार कॉल करूनही ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे याबाबतची माहिती कोंढाळी पोलिसांना देण्यात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
Nagpur Crime News : नागपुरातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतत चाकडोह शिवारात अनियंत्रित स्कूटीसह 20 फूट खड्डयात घसरल्याने स्कूटी चालक वृद्धाचा मृत्यू झाला. पांचू गोपाल भट्टाचार्य (वय 64, रा. भूपेश नगर) नागपूर असे मृताचे नाव आहे. इंडियन ब्युरो ऑफ माइन्सचे सेवानिवृत्त अधिकारी पांचू भट्टाचार्य यांची कोंढाळीजवळ बिहालगोंदी शिवारात शेती आहे.
काल, गुरुवारी (19 जानेवारी) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पांचू भटाचार्य हे शेतीवर येण्यासाठी स्कूटी (एम.एच.31- एफ. व्ही. 9055)ने नागपूर येथून निघाले. मार्गात डिफेन्स गेटनजवळ त्यांची मित्र बबन काटोले (63, रा. नागपूर) यांच्याशी भेट झाली. काटोलेसुद्धा इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे कर्मचारी आहेत. त्यांची शेती पांचू यांच्या शेताशेजारीच बिहालगोंदी पांच भट्टाचार्य शिवारात आहे. ते मोटारसायकलने नागपूरकडून ब्युरो ऑफ शेताकडे जात. बबन काटोले पुढे, तर पांचू भट्टाचार्य मागे होते. बबन काटोले शेतात पोहोचले, पण पांचू भट्टाचार्य सायंकाळपर्यंत शेतात आले नाही. त्यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल करुनही ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे याबाबतची माहिती सायंकाळी सहा वाजता कोंढाळी पोलिसांना देण्यात आली. कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघोडे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल भोजराज तांदूळकर, किशोर लोही, दशरथ पवार, मंगेश धारपुरे, आदींनी मोबाईल फोनच्या लोकेशनच्या आधारे भट्टचार्य यांचा शोध सुरु केला.
दहा किलोमीटर अंतरावर दिसले मोबाईल लोकेशन
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोंढाळीपासून 10 कि.मी अंतरावर रोडपासून 20 फूट खाली एका खड्ड्यात स्कूटीसह भट्टाचार्य यांचा मृतदेह आढळून आला. भट्टाचार्य यांनी हेल्मेट घातले होते, पण तो लॉक नसल्याने स्कूटीसह खड्डयात पडल्याने डोके एका मोठ्या दगडावर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. पण, दाट झाडी झुडपे असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना ते दिसत नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांची स्कूटी चालू होती. त्यांच्याकडे रोख रक्कम व मोबाईल होता. कोंढाळी पोलिसांनी मृतदेह विच्छेदनाकरिता काटोल ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
महामार्गालगत अनेक धोका दायक खड्डे
कोंढाळी गाव असलेल्या नागपूर अमरावती महामार्गाच्या परिसरात रस्त्याच्या बाजूला किंवा काही अंतरावर शासकीय प्रकल्प किंवा काही खासगी जागांवरील धोकादायक जागा आहेत. तसेच महामार्गावरुन गावाकडे जात असतानाच्या मार्गातही असे अनेक धोकादायक जीवघेणे खड्डे आहेत. अशा जागा कमी करणे किंवा किमान या धोकादायक जागांवर सुरक्षेच्या कारणाने सूचना फलक लावल्यास अशा घटना होणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ही बातमी देखील वाचा...