निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या तब्बल 200 कोटी रुपयांच्या थकीत देणीसाठी काँग्रेसचे अजित पवार यांना पत्र
एसटी महामंडळातील 7500 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे 200 कोटी रुपये देणे थकीत असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. थकीत देणी देण्यासाठी राज्य सरकारने एसटीला निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई : एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे आणि वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र, जून 2018 पासून राज्यभरातील तब्बल 7 हजार 500 निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्यापही महामंडळाकडून मिळालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 200 कोटी रुपये देणे थकीत असून अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गेल्या चार वर्षापासून चकरा मारत आहेत. ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडून एसटीला निधी द्यावा, असे पत्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिले आहे.
याबाबत बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, "संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या 7 हजार 500 निवृत्त एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकवण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळवण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, अद्याप महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत. गेल्या चार वर्षात 71 पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली आहे. महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे आणि वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून लगेच दिले जातात. मात्र, जून 2018 पासून राज्यभरातील तब्बल 7 हजार 500 निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाहीत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 200 कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात गेल्या चार वर्षापासून चकरा मारत आहेत."
"एकीकडे पैशांसाठी चकरा माराव्या लागत असताना दुसरीकडे सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांपैकी अंदाजे 71 जण मृत्यू पावल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. निवृत्तीनंतरची सर्व देणी तात्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळालेली नाहीत, हे अन्यायकारक असून मुळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कम सुद्धा कमी मिळते. त्यातही सदर रक्कम थकीत राहिल्याने निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यांना औषध उपचारासाठी सुद्धा रक्कम कामी आलेली नाही," असं जगताप यांनी पुढे म्हटलं.
माझी अर्थमंत्री अजित पवार यांना विनंती आहे की, "आशिया खंडातील सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये एसटी महामंडळ गणले जाते. तरीही 2018 पासून 7 हजार 500 कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे आणि वेतनवाढ फरक मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे." "सर्व निवृत्त कामगारांना आणि अधिकाऱ्यांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह मिळण्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा. अन्यथा आगामी काळात आक्रमक पवित्रा मुंबई काँग्रेसला घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
