राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला अद्याप परवानगी नाही
Rahul Gandhi Mumbai Tour : राहुल गांधी यांचा मुंबईत 28 डिसेंबरला मेळावा होणार का?

Rahul Gandhi Mumbai Tour : राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. राज्य सरकारकडून उत्तर न मिळाल्यानं मुंबई काँग्रेसने हायकोर्टात धाव घेतली आहे. यावर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दादरच्या शिवाजी पार्कवर होणा-या राहुल गांधींच्या सभेला अद्याप महाविकास आघाडी सरकारनं परवानगी दिलेली नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. येत्या 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या पक्षाच्या नियोजित मेळाव्याला परवानगी देण्याचे राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
येत्या 28 डिसेंबर हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 137 वा स्थापना दिवस असून त्यानिमित्त मुंबईत जाहीर सभा घेण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यासाठी 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत शिवाजी पार्क मैदान वापरण्याची परवानगी काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकारकडे मागण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यासाठी मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांची शिवाजी पार्क येथे 28 डिसेंबर रोजी सभा आयोजित केली आहे. त्याबाबत ऑक्टोबर 2021 रोजी या मेळाव्याबाबत राज्य सरकारकडे रितसर अर्जही दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत या अर्जावर राज्य सरकारकडनं कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानावर एका भागात तात्पुरता मंच उभारून सार्वजनिक सभा घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका भाई जगताप यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
सदर याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्यासमोर प्राथमिक सुनावणीसाठी पार पडली. तेव्हा, पालिका आणि आरोग्य विभागानं विहित केल्या सर्व निकषांचं या सभेत पालन करण्यात येईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, शिवाजी पार्क `सायलेन्स झोन’ म्हणून घोषित केला आहे. मात्र, इथं निवडक कार्यक्रम आयोजित करण्यास मूभाही देण्यात आली आहे. त्यात 6 डिसेंबर (डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी), 1 मे (महाराष्ट्र स्थापना दिवस) आणि 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) समावेश आहे. त्यानंतर पालिकेकडून वर्षातून 45 दिवस क्रीडाबाह्य उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले असून 45 दिवसांपैकी 11 दिवस विविध राजकीय उपक्रमांसाठी ठेवण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षीचे 11 दिवस शिल्लक असल्याचं भाई जगताप यांच्यावतीने बाजू मांडताना अँड. प्रदीप थोरात यांनी न्यायालयाला सांगितलं. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी मंगळवारी यावर पुन्हा घेण्याचं निश्चित केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
