पालघरमध्ये महिला पोलिसाने प्रियकरासह सुपारी देऊन पतीला संपवलं, पाच जणांना बेड्या
पालघरमधील रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला प्रियकरासह बेड्या ठोकल्या आहे. त्याची पत्नी पोलीस कॉन्स्टेबल असून ती वसई इथे कार्यरत होती. अनैतिक संबंधांतून हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे.
![पालघरमध्ये महिला पोलिसाने प्रियकरासह सुपारी देऊन पतीला संपवलं, पाच जणांना बेड्या Maharashtra News In Palghar, a woman police officer killed her husband along with her boyfriend, five arrested पालघरमध्ये महिला पोलिसाने प्रियकरासह सुपारी देऊन पतीला संपवलं, पाच जणांना बेड्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/04011801/Screenshot_20210303_181155.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : पालघरमधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस खात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. महिला पोलिसानेच आपल्या प्रियकरासह सुपारी देऊन तिच्या पतीला संपवलं. याप्रकरणी पत्नी आणि प्रियकरासह तीन जणांना पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाचा खून झाल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. रिक्षाचालकाची पोलीस पत्नीने अनैतिक संबंधातून कट रचून त्याची हत्या केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.
रिक्षाचालकाची पत्नी ही वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असून याच पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यासोबत तिचे विवाहबाह्य संबंध होते. या संबंधातून तिने पतीचा खून केला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पाच आरोपींनी खुनाचा कट रचला होता. यामध्ये महिला पोलीस आणि तिचा प्रियकर या दोघांनीही रिक्षाचालक याला मारण्याची सुपारी दिली आणि इतर तिघांनी रिक्षा प्रवासी म्हणून मनोर येथे ढेकाळे परिसरात रिक्षाचालकाला नेऊन त्याच्या डोक्यात लोखंडी रोडणे वार करुन त्याची हत्या केली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 18 फेब्रुवारी रोजी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ढेकाळे गावाच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला रिक्षाचालक पुंडलिक पाटील याचा त्याच्याच रिक्षामध्ये मृतदेह आढळून आला होता. मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला होता. या खुनाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्याकडे देण्यात आला. विकास नाईक यांनी मनोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि पोलिस कर्मचाऱ्यांची विविध पथके स्थापन करुन या गुन्ह्याचा तपास सुरु केला. या गुन्ह्यात मिळालेल्या विविध माहितीच्या अनुषंगाने या पथकांनी या पाच जणांना विविध ठिकाणाहून अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी वेगवेगळ्या तुकड्या करुन वसई, विरार, ठाणे, कल्याण आणि पालघर या शहरात सखोल तपास केला होता.
तपासात मृत पुंडलिक पाटीलच्या पत्नीने अनैतिक संबंधातून सुपारी देऊन खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिक तपास करुन शास्त्रीय पुरावे आणि इतर पुरावे पोलिसांनी जमा केले. खून करण्यासाठी मृत रिक्षाचालक पुंडलिक पाटील याला मुख्य तीन आरोपींनी दोन वेळा मनोर परिसरात भाड्याने आणले होते. तिसऱ्यांदा रिक्षा भाड्याने मिळावी यासाठी त्यांनी त्याला फोन केला.
या खुनात पाच आरोपींना अटक करण्यात आले आहे. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी आणि तीन इतर आरोपींचा समावेश आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)