पर्सनल इज पॉलिटीकल - द सीड ऑफ द सेक्रेड फीग

नोट्स फ्रॉम द सेकंड इयर (१९६८) हे अमेरिकेत प्रकाशित होणारं फेमिनिस्ट (स्त्रीवादी) जर्नल होतं. 'वुमेन्स लिब्रेशन, मेजर रायटींग्स ऑफ द रॅडिकल फेमिनिस्ट' या मथळ्याखाली जर्नलचा पहिला अंक प्रसिध्द झाला. यात कट्टर स्त्रीवादी लेखिका कॅरोल हॅनिश यांनी 'पर्सनल इज पॉलिटीकल' हा लेख लिहिला होता. या लेखात समाजातर्फे अगदी पध्दतशीरपणे महिलांची मुस्कटदाबी किंवा त्यांच्यावर दडपशाही केली जाते, यावर भर देण्यात आला होता. त्यासाठी कॅरोल हॅनिश यांनी अनेक महिलांचे अनुभव आपल्या लेखात कथन केले होते. यात प्रामुख्यानं घरकाम, प्रजननासंदर्भातला अधिकार आणि कामाच्या ठिकाणी होणारा भेदभाव या वैयक्तिक समस्या नाहीत, तर राजकीय आणि सामाजिक जडणघडणीचा भाग बनल्या आहेत, या गोष्टींवर भर देण्यात आला होता. 'पर्सनल इज पॉलिटीकल' या संकल्पनेचा उदयच या लेखापासून झाला. राजकारण हे प्रशासन आणि सार्वजनिक धोरणापलिकडे जाऊन वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करु लागलंय. हा या लेखातला महत्त्वाचा मुद्दा होता. हे सर्व आजपासून जवळपास साठ वर्षांपुर्वीचे अनुभव होते. ते ही अमेरिकेतले. त्यानंतर हळूहळू का होईना तिथली परिस्थिती सुधारली असं म्हणायला वाव आहे. पण जगात अनेक देशांमध्ये महिलांना आपल्या अधिकारांसाठी आजही झगडावं लागतंय.
ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत
मुस्लिम धार्मिक राजवट असलेल्या देशांमध्ये परिस्थिती अजूनही बदललेली नाही. काही वर्षांपूर्वी अरब देशांमध्ये गाडी चालवण्याचा स्वतंत्र परवाना मिळावा यासाठी महिलांनी मोठं आंदोलन केलं. इऱाणमध्ये आज ही हिजाबविरोधातलं आंदोलन तापलं. महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला इराणच्या मोरल पोलीसांनी अटक केली. अटकेदरम्यान झालेल्या मारहाणीमुळं महसाचा मृत्यू झाला. ही घटना २०२२ मध्ये घडली. तेव्हापासून आत्तापर्यंत तिथल्या महिलांनी आंदोलन सुरुच ठेवलंय. तेहरान या राजधानीच्या शहरात ही आंदोलनं होतायत. इराण सरकारनं पध्दतशीरपणे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय. पण रोज नव्या ठिकाणी अनेक तरुणी आंदोलन करतात. तिथली ही अस्वस्थता दिग्दर्शक मोहम्मद रसौफ यांनी ‘द सीड ऑफ द सेक्रेड फीग’ आपल्या सिनेमात मांडली आहे. हा सिनेमा यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी बेस्ट नॉन इंग्लिश फिचर या विभागात स्पर्धा करतोय. जर्मनीतर्फे हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आणि त्यानं शेवटच्या सात सिनेमांच्या नामांकनात आपलं स्थान पटकावलं आहे.
सिनेमाला विशेष ज्युरी पुरस्कार
दिग्दर्शक मोहम्मद रसौफ सध्या जर्मनीत आश्रितआहेत. ‘द सीड ऑफ द सेक्रेड फीग’ हा सिनेमा बनवला आणि त्यांनी जर्मनीला पलायन केलं. त्याआधी इराणमध्येच लपूनछपून त्यांनी सिनेमाचं चित्रिकरण पूर्ण केलं. मोहम्मद रसौफ यांच्या बाबतीत हे नेहमीचं होतं. यापूर्वी त्यांना अराजक माजवण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. जाफर पनाही या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अटकेनंतर इराणमध्ये सरकार विरोधी मतप्रवाह तयार करण्यात मोहम्मद रसौफ यांचा हात मोठा होता. त्यासाठी आठ वर्षांचा कारावासाची शिक्षा झाली होती. रसौफ यांचं तुरुंगात येणं-जाणं सुरुच होतं. पोलीस मागावर असताना त्यांनी हा सिनेमा तयार केला. त्यानंतर त्यांनी पलायन केलं. सलग २८ दिवस ते पायी चालत होते. अखेर ते जर्मनीत दाखल झाले. फ्रान्समधल्या प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. त्यानंतर गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२५ ते आता ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत मोहम्मद रसौफ यांचा सिनेमा टिकून आहे.
चित्रपटाचं कथानक काय?
महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आणि इराणभर आंदोलन व्हायला लागलं. इराणमधल्या महिलांनी ठिकठिकाणी हिजाबची होळी केली. या आंदोलनाची आणि पोलीसांच्या गळचेपीचे व्हिडीओ सोशल मीडीयावर रोजच दिसत होते. हे सर्व व्हिडिओ या सिनेमाच्या कथानकाचा भाग आहेत. इराण सरकारनं या आंदोलनात अटक झालेल्यांच्या निवाड्यासाठी विशेष न्यायालयं सुरु केलीयत. सरकारी अधिकारी असलेला इमान न्यायाधिकारी बनतो. त्याची बायको नजमा आणि दोन मुली रेझवान आणि सना यांना त्याची काळजी वाटायला लागते. आंदोलक न्यायाधीश आणि पोलीसांनावर हल्ले करत आहेत. अगदी सर्वसाधारण दिसणाऱ्या या कुटुंबावर घराबाहेर होणाऱ्या राजकीय घडामोडींचा परिणाम व्हायला लागतो. आणि बाहेरचं राजकारण कुटुंबाचं वैयक्तिक आयुष्य काबिज करतं. एक कुटुंब उध्दवस्त होतं. असं सिनेमाचं कथानक आहे.
'पर्सनल इज पॉलिटीकल' या लेखातले संदर्भ
जवळपास साठ वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या स्त्रीवादी चळवळीचा आढावा घेताना केरॉल यांनी लिहिलेल्या 'पर्सनल इज पॉलिटीकल' या लेखातले अनेक संदर्भ ‘द सीड ऑफ द सेक्रेड फीग’ या सिनेमात सापडतात. ही परिस्थिती फक्त इराणची नाही. जगभरात कमी अधिक प्रमाणात सर्वच देशांमध्ये राजकारणाचा लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात शिरकाव झालाय. त्यामुळं इमानच्या कुटुंबासारखीच परिस्थिती सर्वत्र दिसत आहे.
चित्रपट भारतातही झाला रिलीज
भारतात हा सिनेमा रिलीज होताना सेन्सॉरच्या कात्रीत सापडला. सिनेमाचा मुख्य भाग असलेले हिजाब जाळण्याच्या आंदोलनाची दृश्यच कापण्याची शिफारस करण्यात आली होती.. त्यानंतर तो सेन्सॉर रिव्ह्यूसाठी ही पाठवण्यात आला. कमी अधिक काटछाटीसहित 'द सीड ऑफ द सेक्रेड फीग' सिनेमा सध्या भारतात रिलीज झाला आहे.
























