Mumbai Heavy Rain: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
Mumbai and Thane Rain Updates: मुंबई आणि ठाण्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी पावसाचा अंदाज घेणे गरजेचे आहे. मुंबईत पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी तुंबून व्यवस्था कोलमडू शकते.

मुंबई: मान्सूनचा हंगाम सुरु झाल्यापासून मुंबईत हवा तसा किंवा मुसळधार पाऊस नसल्याची ओरड गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र, रविवारी रात्रीपासून मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे परिसरात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली लावली आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईत (Mumbai Rain) आणि लगतच्या परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. पावसाची संततधार लागून राहिल्याने एकीकडे मुंबईकर सुखावले असले तरी त्यासोबत येणाऱ्या विघ्नांचा सामनाही आता शहरवासियांना करावा लागणार आहे. मुंबई शहर आणि उपनगर परिरसरात काल रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने अनेक सखल भागांमध्ये नेहमीच्या परंपरेप्रमाणे पाणी साचले आहे. (Water Logging in Mumbai)
दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी या परिसरातही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या साचलेल्या पाण्यातून गाड्यांना मार्ग काढता येत आहे. मात्र, वाहतुकीचा वेग मंदावल्याने रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचून चक्काजाम होण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यातही आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.
हवामान खात्याकडून मुंबईत 5 ते 10 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवविला होता. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये मुंबईतील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी पावसाचा अंदाज घेणे गरजेचे आहे. सध्या मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील काही तास पावसाची बॅटिंग सुरु राहील, असे दिसत आहे.
ALERT--Due to Heavy Rain In Mumbai Suburban & Harbour Line Train Traffic Delay Due To Watter Logging.
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 7, 2024
Effected Station- CSMT- CHF-LTT.
मुंबईची लाईफलाईन ठप्प होण्याच्या मार्गावर
मुंबईची लाईफलाईन असणारी उपनगरीय रेल्वे सेवा पावसामुळे विस्कळीत झाली आहे. पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेची मुंबई ते ठाणे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच हार्बर रेल्वेसेवेचे वेळापत्रकही कोलमडले आहे. या मार्गावरील ट्रेन्स विलंबाने धावत आहेत. जोरदार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य आणि हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. याचा फटका कामावर जाणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. मुंबई, कुर्ला, भांडूप, सायन, चुनाभट्टी, एलटीटी या रेल्वे स्थानकांवर पाणी साचले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

