
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात याचिका, आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी; 8 नोव्हेंबरला होणार सुनावणी
Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलीये. तर या आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलीये.

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलनं सुरु आहेत. याच आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte) यांनी हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केलीये. या याचिकेमध्ये मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 25 ऑक्टोबर पासून दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाची हाक दिली. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोनाविरोधात याचिका दाखल केलीये. मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.
गुणरत्न सदावर्ते पुन्हा मराठा आरक्षणाच्या विरोधात
मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याआधी जेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा सदावर्तेंनी त्याला आव्हान दिलं. पण उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं. जे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही. पण आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असल्याचं चित्र आहे. याच आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे.
गुणरत्न सदावर्तेंची मराठा समाजावर सातत्याने टीका
मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसल्यापासून गुणरत्न सदावर्ते सातत्याने समाजावर टीका करत होते. त्यामुळं मराठा समाज नाराज होता. गुणरत्न सदावर्ते यांना बोलू नका, असाही इशारा देण्यात आला होजा. जरांगे पाटील यांनीही थेट इशारा दिला होता. त्यानंतर देखील सदावर्ते वादग्रस्त वक्तव्य करत आहे. महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या सदावर्ते यांच्या विरोधात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड
काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केल्याचं यावेळी निदर्शनास आलं. त्यातच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका करणारे मुख्य याचिकाकर्ते होते. त्यामुळे मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केल्याचं म्हटलं जात होतं.
केवळ प्रसिद्धीसाठी सदावर्तेंची याचिका - विनोद पाटील
मी इथे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की, मराठा समाजाने कुठलीही हिंसा ठरवून केलेली नाही. जी काही घटना घडली त्याबद्दल आम्ही वारंवार दिलगिरी व्यक्त केलेली आहे.जो काही प्रकार घडला, त्यावर पोलिसांनी व कायदे खात्याने सक्त कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आरोपी नक्की मराठा समाजाचे होते की आणखी दुसरे कोणी लोक होते, हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे. त्यात मी अधिक खोलात जात नाही!असे असताना निव्वळ प्रसिद्धीसाठी हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करून स्टंट करणे, हा पोलीस तपासावर प्रभाव टाकणारा प्रकार आहे. माझा मराठा बांधव जसा काही एखादा दहशतवादी असल्यासारखा आवाज गाजावाजा करण्यात येत आहे. रेकॉर्ड ब्रेक मोर्चे काढून आम्ही जगापुढे आदर्श ठेवला. शांततेत आंदोलने केली.यापुढील आमची आंदोलने ही याच प्रकारे होणार आहेत. शांतता आणि संयमाची शिकवण आम्हाला छत्रपतींची आहे. हा सगळा सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार आहे, हे नमूद करू इच्छितो, असं म्हणत विनोद पाटलांनी प्रतिक्रिया दिली.
आता पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज गुणरत्न सदावर्तेंविरोधात आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झालीये. दरम्यान या याचिकेवरील सुनावणीवमध्ये आता काय होतं, हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
