विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
भाजपकडून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उमेदवारी मिळवली असून काँग्रेसकडून सिद्धराम म्हेत्रे यांना मैदानात उरविण्यात आलं आहे.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही सोलापूर जिल्ह्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. तिकीट कोणाला मिळणार यापासून उत्कंठा लागली होती. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात महत्वाच्या लढती होत असून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुती (Mahayuti) विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडी असा थेट सामना होत आहे. त्यामध्ये, भाजपकडून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उमेदवारी मिळवली असून काँग्रेसकडून सिद्धराम म्हेत्रे यांना मैदानात उतरविण्यात आलं आहे. स्वामी समर्थांचं मंदिर असलेल्या अक्कलकोटमध्ये यंदा मतदार कोणाला कौल देतात हे पाहावे लागेल.
अक्कलकोटमध्ये गत 2019 च्या निवडणुकीत काय झालं
अक्कलकोट मतदारसंघात गत 2019 च्या निवडणुकीत भाजप नेते सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस) यांच्यात थेट लढत झाली होती. त्यामध्ये, सचिन कल्याणशेट्टी यांनी 36,769 मतांनी विजयी झाले. कल्याणशेट्टी यांना 1 लाख 19 हजार 437 मतं मिळाली होती. तर, सिद्धाराम म्हेत्रे यांनी 82 हजार 668 मतं मिळाली आहेत. भाजप आमदार असलेल्या कल्याणशेट्टी यांनी विकासकामांच्या माध्यमातून आपलं पारड जड केलं आहे. महायुती सरकारकडून व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळीकतेतून त्यांनी अक्कलकोट मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीत आपलं पारडं जड ठेवलं आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणाला लीड
सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा भाजप महायुतीकडून आमदार राम सातपुते विरुद्ध महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र, या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला असून प्रणिती शिंदे यांना 74 हजार 197 मतांनी विजय झाला आहे. पण, अक्कलकोट मतदारसंघाचा विचार केल्यास राम सातपुते यांना 9 हजार मतांचा लीड मिळाला आहे. येथील मतदारसंघात प्रणिती शिंदे यांची पिछाडी पाहायला मिळाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या ताकदीने येथे भाजप महायुतीला मताधिक्य मिळालं आहे.