Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Varsha Gaikwad On Narendra Modi : मुंबईला ATM समजून लुटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईच्या विकासाच्या थापा मारू नये अशी टीका काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा मुंबईत खोटे बोलून मुंबईकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या विकासासाठी भाजपा सरकारने काम केल्याच्या थापा पंतप्रधान मोदींनी शिवाजी पार्कवरील सभेत मारल्या परंतु वस्तुस्थिती पाहता मुंबईवर मागील 11 वर्षात मोदी सरकारने सातत्याने अन्यायच केला आहे असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्र, हिरे व्यापारासह महत्वाच्या संस्था व कार्पोरेट कार्यालये गुजरातला पळवली. केंद्र सरकारला देशातून सर्वात जास्त निधी देणाऱ्या मुंबई शहराला ATM समजून फक्त लुटण्याचे काम केले आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी केला. मुंबई लाडक्या उद्योगपतीला विकण्याचे काम हाच मुंबईचा विकास आहे का? असा रोखठोक सवालही त्यांनी विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेचा खरपूस समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, ‘एक हैं तो सेफ हैं’ चा नारा देणाऱ्या भाजपा, नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळात मुंबईतील महिला सुरक्षित नाहीत. शाळेत मुली सुरक्षित नाहीत. मंत्रालयात गुंड खुलेआम फिरत आहेत. सत्ताधारी भाजपा युतीचे आमदार, खासदार घरात, मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतात. आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो, फेसबुक लाईव्हवर हत्या होतेय. अशा घटनांमध्ये वाढ झाली असून भाजपा सरकारच्या काळात कंत्राटदार व लाडका उद्योगपतीच ‘सेफ’ आहे सर्वसामान्य मुंबईकर मात्र ‘अनसेफ’ आहे.
नरेंद्र मोदींच्या कंत्राटदारप्रेमी सरकारने मुंबईत विकासाच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार केला, कमीशनखोरी केली असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. त्या म्हणाल्या की, गिरगांव, ताडदेव आणि इतर भागातील प्राचीन मंदिरे बिल्डरांच्या हितासाठी तोडली जात आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या बँकेतील ठेवी तोडून खिसे भरण्याचे काम केले आहे.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे जलपुजन 2017 साली नरेंद्र मोदी यांनीच केले. पण अद्याप या स्मारकाची एक विटही रचली नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मधील स्मारकही अद्याप झाले नाही. महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. मुंबईला सापत्न भावाची वागणूक देऊन विकास केल्याच्या थापेबाजीला मुंबईकर आता बळी पडणार नाही. मुंबईकरांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला जागा दाखवली आहे, विधानसभा निवडणुकीतही मुंबईकर भाजपा शिंदेंच्या भ्रष्ट युतीचा सुपडासाफ करून व्याजासह परतफेड करतील, असा इशाराही खा. वर्षा गायकवाड यांनी दिला.
ही बातमी वाचा :