मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
भाजपकडून अनेक बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाईल, पोलिसांकडून आम्हाला मदत केली जात नाही, असे म्हणत विनापरवाना बंदुका वापरल्या जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असून दोन्ही आघााडी व युतीमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करुन टीका करत आहेत. दुसरीकडे मनसे आणि परिवर्तन आघाडीच्या माध्यमातूनही उमेदवार देण्यात आले आहेत. मनसेच्या उमेदवारांसाठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे एकटेच सभा घेऊन खिंड लढवताना दिसून येतात. त्यामध्ये, महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही त्यांच्याकडून हल्लाबोल केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य केलं जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसे पक्षावर गंभीर आरोप केला आहे. कर्जत येथील मतदारसंघात बोलताना रोहित पवारांनी (Rohit Pawar) मनसे हा पक्ष मतं खाण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. त्यामुळे, आता मनसेकडून रोहित पवारांच्या टीकेला काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहावे लागेल.
भाजपकडून अनेक बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाईल, पोलिसांकडून आम्हाला मदत केली जात नाही, असे म्हणत विनापरवाना बंदुका वापरल्या जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. पाशा पटेल यांच्या उपस्थितीत राम शिंदे यांच्यासाठी काल झालेल्या सभेदरम्यान अश्लील भाषेचा उपयोग केल्यावरुन रोहित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माझ्या विरोधकांना वाटत होतं की मी मतदारसंघात अडकून पडावं, पण मी राज्यातील 30 मतदारसंघात जाऊन प्रचार केला आहे. कारण, माझ्या मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे, पण माझ्या कार्यकर्त्यांवर गुंडागर्दी वाढू शकते. त्यामुळे प्रशासनाने अशा गुंडागर्दी करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही रोहीत पवार यांनी म्हटले. नरेंद्र मोदींच्या सभेत 60 टक्के खुर्च्या मोकळ्या होत्या, त्यामुळे जनतेने त्यांना योग्य उत्तर दिलं आहे. मोदी जरी भाषणात चुकीची भाषा वापरत नसतील तरी शाह चुकीची भाषा वापरतात.अमित शहा हे पंतप्रधान होण्याचा सराव करत आहेत की काय असं वाटतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
राज ठाकरेंची पार्टी, वोट खाऊ पार्टी
मनसेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरुनही रोहित पवारांनी टीका केली. राज ठाकरेंची पार्टी "वोट खाऊ पार्टी" आहे. भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले आहेत. गुजरातच्या नेत्यांकडून महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रातील प्रमुख नेते यावर बोलत नाहीत, असे म्हणत रोहित पवार यांनी मनसेसह राज ठाकरे यांनाही लक्ष्य केलं.
महायुतीत वाद
महाराष्ट्रात आले की शहा द्वेषाची भाषा करतात आणि गुजरातमध्ये गेले की विकासाची भाषा करतात. महायुतीत आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्यात बोलत आहेत, त्यांच्यात खूप वाद होत आहेत. सत्ता आल्यावर महायुतीत खूप वाद होतील त्यामुळेच मविआलाच लोकांनी मतं द्यावीत, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
हेही वाचा
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण