धनंजय मुंडेंचा राजीनामा अन् औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरुन अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा
महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवणारे, गडकोटावर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून जी. आर काढणारे आम्हाला आता शिवभक्ती शिकवणार का? खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा
सांगली : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच औरंगाबाद शहराचे संभाजीनगर करा या मागणीवरुन कोल्हे यांनी भाजपने सत्तेत असताना 5 वर्ष संभाजी महाराजांच्या नावासाठी काय केले असे म्हणत औरंगाबादचे संभाजीनगर करा हा मुद्दा कोण उचलतेय हे पाहून मला फार अप्रूप वाटतेय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक जेवढया नैतिकतेची अपेक्षा आमच्याकडून करतायत तेवढी नैतिकता विरोधकांनी सत्तेत असताना पाळली होती का? विरोधकांनी आता स्वतःला आरशात पाहावे, त्यांनी जर आरशात बघितले तर त्याच्या मागण्यां रास्त ठरतील असे वाटत नाही असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
सांगलीतील म्हैसाळ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हे आले होते. यावेळी कोल्हे यांनी माध्यमाशी संवाद साधताना ही टीका केलीय. मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे, पण त्यावर आता अधिक मुंडेच बोलतील असेही कोल्हे म्हणालेत. औरंगाबादचे संभाजीनगर करा हा मुद्दा कोण उचलतेय हे पाहून मला फार अप्रूप वाटतेय असे कोल्हे म्हणाले.
ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवले, ज्यांनी महाराजाच्या गडकोटावर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून जी आर काढला हे लोक आम्हाला आता शिवभक्ती शिकवणार का? असा सवाल उपस्थित करत जे औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी आता मागणी करत आहेत. त्यांनी त्याच्याकडे 5 वर्ष सत्ता असताना छत्रपती संभाजी महाराजांसाठी नेमके काय केले हा ही प्रश्न त्यांना विचारायला हवा असेही कोल्हे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने छत्रपती संभाजी महाराजाचे नाव विमानतळला द्यावे ही केलेली मागणी स्तुत्य आहे.औरंगाबाद ही जी औरंगजेबाची निशाणी आहे ती कुणालाही भूषणावह नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजाना साजेस शहर असावं हे अशी सर्व शिवप्रेमीची मागणी आहे, तसे आंम्हालाही वाटते असे कोल्हे म्हणाले