Ashok Harnawal on Neelam Gorhe : उद्धव ठाकरेंवर बोलू नका, अन्यथा कुंडली बाहेर काढू
Ashok Harnawal on Neelam Gorhe : ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हे यांच्या जोरदार टीका केली. तसेच, ठाकरे गटाचे पुण्याचे माजी नगरसेवक अशोक हरणावळ यांची मुलाखत घ्या, त्यानंतर गोऱ्हे यांची मर्सिडीज प्रकरण काय आहे ते कळेल. तर नाशिकच्या विनायक पांडेंना (Vinayak Pande) उमेदवारी देण्यासाठी पैसे गोळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते अशोक हरणावळ यांनी नीलम गोऱ्हे यांच्याबाबत खळबळजनक आरोप केलाय.
काय म्हणाले अशोक हरणावळ?
अशोक हरणावळ म्हणाले की, नीलम गोऱ्हे पक्षाच्या संपर्क प्रमुख असताना त्यांनी पुण्याच्या विकास आराखड्याला आधी पाठिंबा द्यायला लावला आणि नंतर विरोध करायला लावला. विकास आराखड्यातील अनेक जागांची आरक्षणे उठवण्यासाठी हे केले गेले. नीलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकार्यांना ब्लॅकमेल करायच्या. निलम गोऱ्हे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कार्यक्रम पत्रिका बघायच्या. त्यातील आर्थिक उलाढालींची माहिती त्यांना हवी असायची. निलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर बोलू नये, अन्यथा त्यांची कुंडली बाहेर काढली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.





















