Ankush Kakde on Sanjay Raut : संजय राऊतांचं शरद पवारांवर वक्तव्य.... अंकूश काकडे म्हणतात...
पुणे: मराठी साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे हे मर्सिडीज घेऊन पदे वाटत असल्याचे सनसनाटी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासाठी एकप्रकारे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मविआचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनाही बोल लावले होते. शरद पवार यांनी नीलम गोऱ्हेंच्या (Neelam Gorhe) वक्तव्यावर व्यक्त झाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गोटातून काहीशी सावध प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक असणाऱ्या अंकुश काकडे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी अंकुश काकडे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करणे टाळले. शरद पवार या सगळ्यावर बोलतील, असेही त्यांनी म्हटले. शरद पवार हे यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. गेल्यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार देऊन गौरव केल्यानंतर शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. तेव्हादेखील मी स्पष्ट केले होते की, शरद पवार स्वागताध्यक्ष असल्याने साहित्य संमेलनातील कार्यक्रम ठरवणे किंवा त्याठिकाणी बोलवण्यात येणाऱ्या पाहुण्यांशी त्यांचा थेट संबंध येत नाही.
या सगळ्यात संयोजन समितीची भूमिका महत्त्वाची असते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कोण येणार, कोणाची भाषणं होणार, याची कल्पना स्वागताध्यक्षांना नसते. नीलम गोऱ्हे साहित्य संमेलनात आल्या. त्यांनी राजकीय वक्तव्यं केलं. त्यांच्या या वक्तव्याचा साहित्याशी काहीही संबंध नव्हता. राजकारण आणि साहित्य ही वेगवेगळी क्षेत्रे आहेत, त्यांची गल्लत करु नये, असा संकेत आहे. मात्र, नीलम गोऱ्हे यांनी ती गल्लत केली. त्यासाठी नीलम गोऱ्हे यांचा मी निषेध करतो, असे अंकुश काकडे यांनी म्हटले.






















