Aurangabad Crime News: तो आला अन् चक्क लग्नातील आहेराचा डब्बा घेऊन फरार झाला, घटना सीसीटीव्हीत कैद
Aurangabad Crime News: या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका लग्नसमारंभा दरम्यान झालेल्या एका आगळ्यावेगळ्या चोरीची घटना समोर आली आहे. लग्न विधी सुरु असताना याचाच फायदा घेत एका अल्पवयीन चोरट्यांनी चक्क आहेराचा डब्बा लांबविल्याची घटना शुक्रवारी वाळूज परिसरात समोर आली आहे. या आहेराच्या डब्ब्यात एकूण 25 हजार रुपये होते. तर आहेराचा डब्बा लांबविणारा अल्पवयीन चोरटा व त्याचा साथीदार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूरच्या समीक्षा संजय जैस्वाल हिचा शुक्रवारी पहाडसिंगपुरा येथील धनराज जैस्वाल या तरुणासोबत नगर रोडवरील हॉटेल ए. एस. क्लबमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्नसमारंभात वधू-वराकडील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान लग्नात आलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींनी वधू समीक्षा हिला आहेर म्हणून, काही रोख रक्कम देण्यात आली होती. तर आहेराचे पैसे एका स्टीलच्या डब्यात जमा करून लग्नमंडपातच हा डब्बा ठेवला होता.
अन् चक्क आहेराचा डब्बा लांबवला...
समीक्षा आणि धनराज यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर वधू-वर फेरे घेत होते. त्यामुळे संपूर्ण लग्नात आलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींचे लक्ष वधू-वरांकडेच होते. याचाच फायदा घेत एका 12 ते 14 वर्षे वयाच्या लहान मुलाने लग्नमंडपात ठेवलेला आहेराचा डब्बा घेऊन फरार झाला. लग्नसोहळा पार पडल्यानंतर काही वऱ्हाडी पुन्हा आहेर करत असताना आहेरचा डब्बाच गायब असल्याचे समोर आले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
मुलासोबत आला होता आणखी एक व्यक्ती...
लग्नाच्या विधी संपल्यावर आलेल्या वऱ्हाडामधील काही जण आहेर करण्यासाठी आले. मात्र त्यावेळी तिथे आहेराचा डब्बा दिसून आला आहे. बराच शोध घेतल्यावर डबा तिथे सापडला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. ज्यात पांढरा शर्ट व निळ्या रंगाची पँट, डोक्यावर स्पोर्टसची टोपी घातलेला एक 12 ते 14 वर्षांचा लहान मुलगा आहेराचा डब्बा घेऊन फरार झाल्याचे दिसून आला. विशेष म्हणजे लग्नमंडपातून बाहेर पडल्यानंतर या अल्पवयीन मुलासोबत काळ्या रंगाचा शर्ट व चॉकलेटी रंगाची पॅन्ट परिधान केलेला एक 30 ते 35 वर्षाचा व्यक्ती जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तर याप्रकरणी वधूचे चुलते मनोज जैस्वाल यांनी 25 हजारांचा आहेराचा डब्बा लांबविणाऱ्या दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
