Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
Tanaji Sawant: एखादी हायप्रोफाईल केस असली की पोलीस किती वेगाने काम करु शकतात, याचा प्रत्यय तानाजी सावंत यांच्या मुलाच्या प्रकरणात आला. तानाजी सावंतांच्या मुलाचं विमान हवेतून माघारी

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात मनी आणि मसल पॉवर अशा दोन्ही गोष्टी पदरी बाळगणारे नेते म्हणून ख्याती असलेले शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत सध्या अचानक चर्चेत आले आहेत. यासाठी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांची बँकॉकवारी कारणीभूत ठरली आहे. ऋषिराज सावंत हे सोमवारी पुणे विमानतळावरुन आपल्या मित्रांसोबत बँकॉकला (bangkok trip) रवाना झाले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऋषिराज सावंत (Rishiraj Sawant) कोणालाही न सांगता अचानक घरातून बाहेर पडले. त्यानंतर चार्टर्ड फ्लाईटने बँकॉकच्या दिशेने रवाना झाले. मात्र, ऋषिराज अचानक घरातून गायब झाल्याने त्यांचे अपहरण झाले असावे, असा संशय तानाजी सावंत यांना आला. यानंतर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुणे पोलीस आयुक्तांना यांना फोन लावून सगळा प्रकार सांगितला. तोपर्यंत पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची बातमी समजली होती.
हायप्रोफाईल केस असल्यामुळे पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये ऋषिराज सावंत यांचा माग काढलाच पण ऋषिराज सावंत यांचे बँकॉकला जाणारे विमान अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरवण्यात आले. हे विमान अंदमान-निकोबारपर्यंत पोहोचले होते. एटीसीने चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाला विमान परत पुण्याला घेऊन येण्यास सांगण्यात आले. त्यामुळे हे चार्टर्ड प्लेन आधी चेन्नईला नेण्यात आले तिथून हे विमान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर दाखल झाले. हा सगळा घटनाक्रम एखाद्या चित्रपटात शोभेल असा होता. एका शक्तिशाली नेत्याच्या मुलाला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा किती जलद पद्धतीने काम करु शकते आणि वेळ पडल्यास विमान हवेतूनही माघारी फिरवू शकते, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. अर्थात या घटनेमुळे मंत्रिमंडळ किंवा प्रशासनात कोणत्या महत्त्वाच्या स्थानी नसतानाही तानाजी सावंत यांची वट किती आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने कारवाई केली
एरवी एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्ती अपहरणाची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेल्यास त्याला 24 तासांसाठी थांबण्यास सांगितले जाते. व्यक्ती बेपत्ता होऊन 24 तास उलटल्याशिवाय तक्रार घेतली जात नाही. मात्र, तानाजी सावंत यांनी दुपारी साडेचार वाजता आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली अन् पुणे पोलिसांनी अक्षरश: वाऱ्याच्या वेगाने काम करत ऋषिराज सावंत यांचा माग काढला. ऋषिराज सावंत बँकॉकच्या विमानात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी लोहगाव विमानतळ प्रशासनाशी बोलून अवघ्या पाच तासांमध्ये चार्टर्ड प्लेन माघारी आणले. पुणे पोलिसांची ही कार्यतत्परता अगदी दृष्ट लागण्यासारखी होती.
आणखी वाचा
मुलाचं अपहरण नाही, तो चार्टर प्लेनने मित्रासोबत बाहेर गेला; तानाजी सावंत यांचा खुलासा
























