Aurangabad Crime News: लाच लुचपत विभागाने कारवाई केलेल्या ऋषिकेश देशमुखच्या घरात पैसे मोजण्याची मशीन सापडली
Aurangabad: धक्कादायक म्हणजे यातील दुसरा आरोपी कंत्राटी लिपिक भाऊसाहेब दादाराव गोरे याच्या घरातून 9 लाख 90 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) लाच लुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) 6 फेब्रुवारीला एका मोठी कारवाई करत जलसंधारण विभागातील उपविभागीय अधिकारी ऋषिकेश देशमुख यांना अटक केली होती. देशमुख यांना तब्बल साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋषिकेश देशमुखच्या घरात चक्क पैसे मोजण्याची मशीन सापडली आहे. सोबतच 17 हजारांची रोकडही मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे यातील दुसरा आरोपी कंत्राटी लिपिक भाऊसाहेब दादाराव गोरे याच्या घरातून 9 लाख 90 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.
ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यान परभणी येथील एका कंपनीच्या कामाचे पैसे काढून देण्यासाठी देशमुख याने टक्केवारी मागितली होती. मात्र तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. तर यावरून एसीबीने केलेल्या कारवाईत ऋषिकेश देशमुख आणि कंत्राटी लिपिक भाऊसाहेब दादाराव गोरे या दोघांना आठ लाख 53 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आल्या आहेत.
देशमुखच्या घरात पैसे मोजण्यासाठी मशीन...
तब्बल आठ लाख 53 हजारांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या ऋषिकेश देशमुखच्या घराची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे. ज्यात त्याच्या घरात नवीन कोरी सील बंद पैसे मोजण्याची मशीन मिळाली आहे. सोबत 17 हजारांची रोकड देखील मिळाली आहे. त्यामुळे देशमुख याने पैसे मोजण्यासाठी मशीन का आणली होती? तसेच आणखी कुठे रक्कम ठेवलेली आहे का? असा सर्व पद्धतीने पोलिसांकडून तपास सुरु आहे.
लिपिकाच्या घरात 9 लाख 90 हजाराची रोकड...
दरम्यान एसीबीने कारवाई केल्यावर या प्रकरणातील दुसरा आरोपी कंत्राटी लिपिक भाऊसाहेब दादाराव गोरे याच्या घरावर देखील छापा मारला. यावेळी त्याच्या घरात तब्बल 9 लाख 90 रुपयांची रोकड मिळून आली आहे. त्यामुळे त्याने एवढ्या मोठ्याप्रमाणावर रक्कम कोठून आणली, ते पैसे कोणाचे आहेत. या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पण या सर्व घटनेने जलसंधारण महामंडळात मोठी खळबळ उडाली आहे.
देशमुखचे राजकीय संबध...
एसीबीने कारवाई केलेल्या ऋषिकेश देशमुख याची राजकीय नेत्यांमध्ये उठबस असायची. तर त्याचे मोठमोठ्या नेत्यांसोबत चांगले संबध असल्याचे देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर कारवाई झाल्यावर त्याच्या बचावासाठी अनेक मोठ्या नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आल्याचे देखील बोलले जात आहे. तर देशमुख याचे मोठमोठ्या नेत्यासोबत असलेले फोटो देखील समोर आले आहेत.
संबंधित बातमी:
मोठी बातमी! साडेआठ लाखांची लाच घेणाऱ्या जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्याला औरंगाबादमध्ये अटक