
उजनी धरणात घातक सकर मासा मिळू लागल्याने मच्छिमार अडचणीत
सकर माशांची वाढ जलदगतीने तर होतेच त्याशिवाय हा मासा मांसाहारी असल्याने तो इतर माशांना व त्यांची अंडी खाण्यात तरबेज असतो. हा मासा टणक असल्याने इतर माशांपासून सकर मासा सुरक्षित राहतो.

सोलापूर : उजनी जलाशयात मांगुर मासे सापडल्यानंतर आता आणखी एका उपद्रवी, घातक असलेले सकर मासे सापडू लागल्याने मासेमारांची चिंता वाढली आहे. सकर हा मासा मोठ्या प्रमाणात उजनीत सापडू लागल्याने इतर माशांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. तसेच मच्छिमारांच्या जाळ्यांचेही अतोनात नुकसान होऊ लागल्याने मच्छिमारही हैराण झाले आहेत.
सकर माशांचे उगमस्थान तसे अमेरिकेतले आहे. कालांतराने मुबंई खाडीत व वाराणसीच्या गंगा नदीत आढळून आला होता. तेव्हापासूनच मत्स्य अभ्यासकांनी धोक्याची सूचना दिली होती. मात्र या धोकादायक माशाने आता राज्यातील सर्वात मोठे उजनी पाणलोट क्षेत्र व्यापून टाकले आहे. या माशांची ओळख फिश टॅंकमधील मासा म्हणून होती. मात्र फिश टॅंकमध्ये अनेक माशांनी प्रवेश केल्यानंतर व पाळणाऱ्यांची हौस फिटल्यानंतर हा मासा खाडीत, नदीत सोडून देण्यास सुरुवात झाली.
सकर माशांची वाढ जलदगतीने तर होतेच त्याशिवाय हा मासा मांसाहारी असल्याने तो इतर माशांना व त्यांची अंडी खाण्यात तरबेज असतो. हा मासा टणक असल्याने इतर माशांपासून सकर मासा सुरक्षित राहतो. साहजिकच त्याची संख्यावाढ जलदगतीने होते. असा हा सकर मासा उजनीत मोठ्या संख्येने आढळून येऊ लागला आहे.
मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकल्यानंतर तो सहजासहजी जाळ्यातून निघत नाही त्यासाठी जाळी फाडवी लागत आहेत. त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान सध्या होताना दिसत आहे. उजनीचे वाढते प्रदूषण, बेकायदेशीर व व्यावसायिक मासेमारी यामुळे उजनीतील मासेमारी धोक्यात सापडली असताना आता मोठ्या प्रमाणात सापडू लागलेल्या या धोकादायक सकर माशांमुळे अडचणी वाढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
