Jayant Patil And Gopichand Padalkar: दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होत नाही...; जयंत पाटील यांचा निशाणा, गोपीचंद पडळकरांचंही प्रत्यु्त्तर
Jayant Patil And Gopichand Padalkar: जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांची एकाच व्यासपीठावरुन एकमेकांवर टीका टिप्पणी पाहायला मिळाली.

Jayant Patil And Gopichand Padalkar: सांगलीमधील लोकसभा आणि विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदार-आमदारांचा मिरजमध्ये ब्राह्मण समाजाच्यावतीने सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जयंत पाटील (Jayant Patil) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची एकाच व्यासपीठावरुन एकमेकांवर टीका टिप्पणी पाहायला मिळाली.
अलीकडे वेगवेळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे. आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढत असेल तर दुसऱ्याला शिव्या देणं ही एक पद्धत सुरु झालीय. शिव्या देणाऱ्या त्या व्यक्तीला तो समाज डोक्यावर घेतो हे दुर्दैवानं आपण या देशात पाहतोय. दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होत नाही तर त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते हे काही जणांच्या अजून लक्षात आलं नाही. दुसऱ्याना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही ही खूणगाठ सर्वांनी बांधली पाहिजे. ज्या यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्ये आपण गुण्या गोविंदाने राहत होतो त्या महाराष्ट्रमध्ये आज जाती जातीत द्वेष पसरायला लागला आहे हे दुर्दैवी आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांव निशाणा साधला.
केतकी चितळेंचा आता जयंत पाटलांनी आदर्श घ्यावा- गोपीचंद पडळकर
महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीयवाद सुरू आहे. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीप्रमाणे सध्या होताना दिसत नाही. बोलणारे तसे बोलत नाहीत. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण या ऊक्तीप्रमाणे अनेक नेते सध्या महाराष्ट्रात मार्गदर्शन करतात. तसे मार्गदर्शन काही वेळापूर्वी या स्टेजवर आपण सर्वांनी ऐकलं असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना चिमटा काढला. केतकी चितळे जी भूमिका घेते त्या भूमिकेवर ती ठाम राहते . त्या केतकी चितळेंचा आता जयंत पाटलांनी आदर्श घ्यावा. नाहीतर सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव घेत टीका केली.























