गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
मॉडर्न शाळेच्या गेटवर वॉचमनने मोकाट सुटलेल्या या रेड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेडा सरळ शाळेच्या गेटमधून आतमध्ये शिरला आणि काही विद्यार्थ्यांना जखमी करुन गेला.
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे सर्वजण नव वर्षाचे उत्साहात आणि आनंदात स्वागत करत असताना काही अपघाताच्या (Accident) व इतरही दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेत, महाविद्यालयातही विद्यार्थी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नववर्षाचे स्वागत करत आहेत. मात्र, संभाजीनगर शहरातील जुबली पार्क भडकल गेट परिसरामध्ये असलेल्या नवखंडा कॉलेज परिसरात आजच्या सकाळी वेगळाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळाले. येथील परिसरा असलेल्या मॉडर्न स्कूलमध्ये शाळेच्या मधल्या सुट्टीत विद्यार्थी बाहेर आले असता एक रेडा शाळेमध्येच (School) घुसला होता. मोकळा सुटलेला हा रेडा बाहेर दोन तीन जणांना धडक देऊन सरळ शाळेच्या परिसरात घुसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही चांगलीच धांदल उडाली होती. त्यामुळे, शाळा परिसरात धावपळ सुरु झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, या रेड्याच्या धडकेत काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले होते.
मॉडर्न शाळेच्या गेटवर वॉचमनने मोकाट सुटलेल्या या रेड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेडा सरळ शाळेच्या गेटमधून आतमध्ये शिरला आणि काही विद्यार्थ्यांना जखमी करुन गेला. त्यानंतर, शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना घाटीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमध्ये भरती केले. येथे शाळेतील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच, विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनेची माहिती मिळताच शाळेत व रुग्णालयात धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोण्या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नाही, किंवा कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र, हा रेडा शाळेत कसा आला आणि कोणाचा आहे, तो मोकळा का फिरत होता, अशा प्रश्नांनी शाळा परिसर चर्चेचा विषय बनला होता.