मास्टरमाईंड वाल्मिक..खंडणी ते हत्येपर्यंतची लिंकही सापडली, उज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर आता संतोष देशमुख प्रकरणाची पहिली सुनावणी
संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणाची सुनावणी आता इथून पुढे केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे .

Beed: गेल्या अडीच महिन्यांपासून महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवे खुलासे आणि गौप्यस्फोट झाले . (Santosh Deshmukh Case) सीआयडीने केज न्यायालयात दाखल केलेल्या 1400 पानी दोषारोपपत्रानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड ' वाल्मिक कराडच(Walmik Karad) असल्याचे समोर आले .दुसरीकडे,या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती झाल्यानंतर आता या केसची पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे .
केजच्या सत्र न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणाची सुनावणी आता इथून पुढे केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे .12 मार्चला या प्रकरणांची पहिली सुनावणी पार पडेल .काही दिवसांपूर्वी बीडच्या मकोका न्यायालयातून हे प्रकरण बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं होतं .विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर या प्रकरणावर 12 तारखेची पहिलीच सुनावणी असेल . या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीला उज्वल निकम हजर राहतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .
खंडणीतूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे उघड
दरम्यान या प्रकरणात शनिवारी आरोपपत्रांमधून झालेल्या मोठ्या खुलाशांनी संतोष देशमुख प्रकरणातील सारेच चित्र स्पष्ट झाले आहे . खंडणी ॲट्रॉसिटी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण या तिन्ही प्रकरणांचा सहसंबंध दोषारोप पत्रात एकत्रित आल्याने आता या तिन्ही प्रकरणांची साखळी एकच असल्याचे समोर आले आहे . खंडणीपासून सुरू झालेले हे प्रकरण हत्येपर्यंत जाऊन थांबले .दरम्यान आता संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाची एकत्रित सुनावणी केजच्या सत्र न्यायालयात 12 मार्च 2025 ला होणार आहे .विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती झाल्यानंतर ही पहिलीच सुनावणी असेल .
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार ?
खंडणीच्या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा उल्लेख आरोप पत्रातून समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे .गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी सातत्याने होत आहे .जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्षाकडून धनंजय मुंडेंवर कारवाई होणार नाही असं उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवारांनी भूमिका घेतली होती .दरम्यान धनंजय मुंडे यांच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत .पोलिसांच्या आरोप पत्रानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच करुणा शर्मा यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टही केलीय .
हेही वाचा:























