Anil Ghanwat : अब्दुल सत्तारांच्या राजकीय स्वार्थासाठी असलेला कृषी महोत्सव रद्द करा, अनिल घनवटांची मागणी
सिल्लोडचा कृषी महोत्सव रद्द करावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या स्वार्थासाठी हा महोत्सव असल्याचे घनवट म्हणाले.

Anil Ghanwat : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजकीय स्वार्थासाठी होणारा सिल्लोड कृषी महोत्सव (Sillod Agriculture Festival) रद्द करण्यात यावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी केली आहे. या महोत्सवासाठी बेकायदेशीररित्या पैसे जमवण्यात आल्याचे घनवट म्हणाले. महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पंधरा कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्याचे आदेश कृषी विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महोत्सवाच्या ज्या प्रवेशिका छापण्यात आल्या आहेत त्यावर ना मूल्य, ना क्रमांक ना आयोजकांचे नावे. कृषिमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची छायाचित्रे मात्र त्यावर असल्याचे घनवट म्हणाले.
या महोत्सवासाठी 15 ते 50 कोटी रुपये जमा करण्यात येणार
सिल्लोड महोत्सवासाठी सुमारे 15 ते 50 कोटी रुपये जमा करायचे आहेत. त्यासाठी शेतीनिविष्ष्ठांचे उत्पादक, वितरक, कृषी सेवा केंद्र चालकांकडून सक्तीने निधी जमवण्यात येणार आहे. ही जवाबदारी सर्व स्तरातील कृषी अधिकाऱ्यांसहित गुणनियंत्रण अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. असे झाल्यास महोत्सवासाठी खर्च केलेले पैसे वसूल करण्यासासाठी व्यवसायिक, लिंकिंग किंवा सदोष माल शेतकऱ्यांना विकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अनिल घनवट म्हणाले.
व्यवसायिकांवर दिवस ढवळ्या दरोडा
दरम्यान, सिल्लोड महोत्सवासाठी 25 हजार, 15 हजार, 10 हजार व 7 हजार 500 रुपयांच्या प्रवेशिका छापल्या आहेत. जिल्ह्याच्या आकारानुसार वसुलीची सक्ती केली जात आहे. हा व्यवसायिकांवर दिवस ढवळ्या दरोडा असल्याचा आरोप अनिल घनवट यांनी केला. उद्योजकांना ही महागडे स्टॉल घेण्याची सक्ती होत आहे. सहा डिसेंबर रोजी कृषी आयुक्तांनी सर्व कृषी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून निधी जमा करण्याचे आदेश दिले असल्याचे घनवट म्हणाले. वसूलिची जवाबदारी ज्या वक्तींकडे आहे ते वसुलीसाठी, कृषी अधिकाऱ्यांना शिवीगाळ, निलंबित करण्याच्या, बदली करण्याच्या धमक्या देत असल्याचा प्रकार घडत असल्याचे अनिल घनवटांनी सांगितले.
महोत्सवातून अब्दुल सत्तार सोडले तर कोणाचाच फायदा होणार नाही
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजकीय लाभासाठी सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा बेकायदेशीर कार्यक्रम आहे. संपूर्ण कृषी विभागाला बेकायदेशीरपणे, बेकायदा वसुली करण्यास भाग पाडले जात आहे. यातून अब्दुल सत्तार सोडले तर कोणाचाच फायदा नसल्याचे घनवट म्हणाले. शासनाने सिल्लोड महोत्सव हा कार्यक्रम तातडीने रद्द करावा. तसेच या महोत्सवातील आर्थिक व्यवहारांची ईडी किंवा आयकर विभागामार्फत कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Abdul Sattar : विरोधकांच्या आरोपानंतर कृषीमंत्री सत्तार काय बोलणार? सभागृहात वातावरण तापण्याची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
