Abhijeet Pawar: अभिजीत पवारांची 2 दिवसात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून घरवापसी! पक्षप्रवेशाबाबत केले गंभीर आरोप, म्हणाले, '...तर मी जीव देणार होतो!'
Abhijeet Pawar: अवघ्या दोनच दिवसांमध्येच गुरूवारी अभिजीत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला रामराम करत पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दिनांक 18) मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू असतानाच, मात्र, अवघ्या दोनच दिवसांमध्येच गुरूवारी अभिजीत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला रामराम करत पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अभिजीत पवार यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन या पक्ष प्रवेशासाठी प्रचंड दबाब टाकण्यात आला होता, असा आरोप केला. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला नसता तर आत्महत्या केली असती अशी धक्कादायक कबुली त्यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणालेत अभिजीत पवार?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाण्यासाठी माझ्यावर अतिशय दबाव टाकण्यात आला. केवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्यासाठीच माझा वापर केला जाणार होता, असा गंभीर आरोप अभिजित पवार यांनी काल (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला नसता तर मी आत्महत्या केली असती, असा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.
आज पुन्हा मी घरवापसी केली असून, मरेपर्यंत जितेंद्र आव्हाड हेच माझे नेते असतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वीच अभिजित पवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत अजित पवार गटात प्रवेश झाला. परंतु, अवघ्या दोन दिवसांत त्यांनी घड्याळाची साथ सोडून पुन्हा तुतारी हाती घेतली. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, माझ्यावर गुन्हा दाखल करून मला पुन्हा दोन वर्षे जेलमध्ये पाठवण्याचे प्लॅनिंग होते. माझ्या मित्रांना पोलिसांकरवी धमक्या दिल्या. ईडीची धमकी दिली जात होती, त्यामुळे अस्वस्थ झालो होतो. नजीब मुल्ला मला फोन लावून देऊन इतरांकरवी धमक्या देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळेच मी आव्हाड यांना न सांगता केवळ दबावापोटी अजित पवार गटात गेलो होतो. परंतु, माझा वापर केवळ आव्हाड यांना अडकविण्यासाठी केला जाणार, हे लक्षात येताच मी पुन्हा आव्हाडांकडे आलो. माझ्या आईला आणि पत्नीला घाबरवण्याचा प्रयत्न झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
... तरी त्यांना सोडणार नाही
अभिजीत पवार म्हणाले, आता जितेंद्र आव्हाड यांनी मला आपलेसं केलं नाही तरीसुद्धा मी आव्हाडांना सोडणार नाही, असंही ते म्हणालेत.
48 तासांत अजित पवारांची साथ सोडली
आमदार जितेंद्र आव्हाडांचे स्वीय सहायक अभिजित पवार यांनी त्यांची साथ सोडली आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण अवघ्या 48 तासांत त्यांनी यूटर्न घेतला आहे. अभिजीत पवार स्वगृही परतले आहेत. अभिजीत पवार आणि हेमंत वाणी यांनी मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, पुन्हा गुरूवारी ते स्वगृही परतले.
आज ठाणे आणि धुळे येथील अन्य पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. श्री. अभिजित पवार, श्री. हेमंत वाणी, श्रीम. सीमा वाणी यांसह अनेक मान्यवरांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या आदर्श विचारांशी एकरूप होण्याचा, पक्षाच्या जनकल्याणाच्या कार्यात… pic.twitter.com/6NTBuzZ4Pv
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 18, 2025
























