Dhananjay Munde: धनंजय मुंडे लोकांमधून निवडून आलेत, तुमची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी... गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल
Dhananjay Munde & Anjali Damania: धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्याच्या खरेदीत घोटाळ केल्याचा गंभीर आरोप आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात.

मुंबई: राज्याचं मंत्रिमंडळ कोणाच्या बापाच्या घरचं नसतं. हे मंत्रिमंडळ भारताच्या संविधानामुळे अस्तित्त्वात आले आहे. लोकांमधून लोक निवडले जातात. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांचा राजीनामा मागणाऱ्या अंजली दमानिया कोण?, असा सवाल गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी उपस्थित केला. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेल्या कथित घोटाळ्यांची जंत्री मांडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याविरोधात गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दंड थोपटले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांनी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हटले की, आम्ही भगवान बाबांना मानणारे लोक आहोत. अंजली दमानिया किंवा अन्य कोणी म्हटल्यामुळे धनंजय मुंडे यांची खुर्ची कोणीही घेऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांच्यावर लाखो-करोडो लोकांचे प्रेम आहे. धनंजय मुंडे यांना जनतेने लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले आहे. अंजली दमानिया आधी तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिंकून दाखवा. स्वत:ची उंची तयार करा. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण?, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता यावर अंजली दमानिया काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अंजली दमानियांकडून धनुभाऊंवर कृषी खात्यात घोटाळ्याचे आरोप
अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्रिपदाच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून धनंजय मुंडे यांनी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या कॅबिनेटचे काही निर्णय झाले. पण यात कृषी विभागाशी संबंधित न झालेल्या निर्णयांबाबत धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) आदेश काढला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 कोटींच्या निधीचा कुठेही उल्लेख नसताना ती रक्कम आजच अदा करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी पत्रातून केले, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. मात्र, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून पत्रक काढून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

