व्वा...! यवतमाळमधील आदिवासी विद्यार्थिनींची कमाल, स्वत: बनवलेले 5 उपग्रह अंतरिक्षात सोडणार
निष्णात शास्त्रज्ञांना कठीण वाटावं असं कार्य यवतमाळच्या ग्रामीण भागातील मुलींनी जिज्ञासूवृत्तीने केले आहे.7 फेब्रुवारीला एकाच वेळी 100 उपग्रह रामेश्वरमच्या अवकाशात सोडण्यात येणार आहेत, त्यातले पाच उपग्रह या विद्यार्थिनींनी केलेत.
![व्वा...! यवतमाळमधील आदिवासी विद्यार्थिनींची कमाल, स्वत: बनवलेले 5 उपग्रह अंतरिक्षात सोडणार 5 self-made satellites made by tribal students from Yavatmal will be launched into space व्वा...! यवतमाळमधील आदिवासी विद्यार्थिनींची कमाल, स्वत: बनवलेले 5 उपग्रह अंतरिक्षात सोडणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/23002358/yavatmal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
यवतमाळ : उपग्रहाबद्दल अनेकदा पुस्तकात वाचलं टीव्ही वर पाहिलं परंतु उपग्रहच स्वतः तयार करून ते अंतरिक्षात सोडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची किमया यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी एका ध्यासातून करून दाखविली आहे. येत्या 7 फेब्रुवारीला 100 उपग्रह एकाच वेळी अंतरिक्षात सोडले जाणार आहेत. त्याच 100 पैकी 5 उपग्रह तयार करण्याचे काम आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी करून आम्ही कुठेही कमी नाही असं कृतीतून करून दाखविले आहे.
निष्णात शास्त्रज्ञांना कठीण वाटावं असं कार्य या ग्रामीण भागातील मुलींनी जिज्ञासूवृत्तीने केले आहे. डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची बांधणी झाली आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेच रिसर्च पेलोड क्युब्ज चॅलेंज 2021 या उपक्रमात हे विद्यार्थी सहभागी झाले. सायंटिफिक हेलियम बलूनद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण केल्यानंतर हे उपग्रह पृथ्वीपासून 38 हजार मीटर अंतरावर स्थापित केले जाणार आहेत. त्यानंतर अंतराळातून पृथ्वीवर स्थापना केलेल्या केंद्राशी कसा संपर्क होतो तसेच अंतराळातील ओझोनचा थर, कार्बन डायऑक्साइड आदी बाबींचा सूक्ष्म अभ्यास हे विद्यार्थी या उपग्रहाच्या माध्यमातून करणार आहे. फाउंडेशनच्या वतीने या कार्यासाठी लहान आकाराचे उपग्रह तयार करून घेणे आणि ते प्रक्षेपित करणे यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला होता. यात 7 फेब्रुवारीला एकाच वेळी 100 उपग्रह रामेश्वरमच्या अवकाशात सोडण्यात येणार आहे.
या मोहिमेत महाराष्ट्राचे 100 विद्यार्थी सहभागी होणार असून एकट्या यवतमाळ जिल्ह्याच्या पाटणबोरी येथील 30 विद्यार्थी या मोहिमेत सहभागी आहेत. काबाडकष्ट करणाऱ्या अत्यंत गरीब आणि काही निरक्षर तसेच अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील या मुली असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद आणि आदिवासी आश्रम शाळेत झाले. त्यानंतर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत नामांकित इंग्लिश शाळा योजनेत त्यांचा प्रवेश पाटणबोरी येथील रेड्डी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये झाला. आता त्या 10 व्या वर्गात आहेत.
विद्यार्थिनींची गगनभरारी
मराठी पार्श्वभूमीतून आलेल्या या विद्यार्थीमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द होती आणि त्यांना रेड्डी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये त्यांच्यावर पैलू पडले आणि कालपर्यंत नीट मराठीत न बोलता येणाऱ्या मुलींनी आता मराठीसह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आहे. विज्ञान तंत्रज्ञान याचे ज्ञान आत्मसात केले आणि आज हेच विद्यार्थी उपग्रह स्थापन करण्याच्या विषयावर फाडफाड बोलतात. या विद्यार्थीनी कोडिंग शिकल्या तसेच उपग्रहांबद्दल बारीकबारीक तपशील जिज्ञासू पध्दतीने शिकल्या. आता त्यावर त्या सहज बोलतात आता तर 2021 मध्ये होणाऱ्या या मोहिमेत या विद्यार्थ्यांनी 5 उपग्रह तयार केले असून त्याचे प्रक्षेपण 7 फेब्रुवारी रोजी रामेश्वरम येथून होणार आहे. विद्यार्थ्यांचा हा बद्दल खूप कौतुकास्पद आहे. त्यांची ही कामगिरी पाहून अभिमान वाटतो असे शाळेच्या मुख्याध्यापिका सविता रेड्डी यांनी सांगितले.
आईवडिलांसह अनेकांचा उर अभिमानाने भरला
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नुकतेच नागपूर येथे उपग्रह बनविण्याचे प्रशिक्षण घेतले असून उपग्रहाची प्रत्यक्ष जुळवाजुळव सुध्दा त्यांनी केली आहे. आदिवासी बहुल भागातील विद्यार्थिनींनी तयार केलेले उपग्रह आकाशात झेपावणार आहे. आता आम्ही तयार केलेलं उपग्रह झेपवणार असून या सर्वांमुळे आमच्या गावाकडं आईवडिलांना कौतुक वाटतेय. शिवाय नातलगसुध्दा आता कौतुकाने आम्हाकडे बघतात. आम्हाला पुस्तकात जे वाचलं ते प्रत्यक्षात करून पाहायचं होतं आणि आम्ही ते करून दाखविले आहे असे वैजयंती चिकराम या विद्यार्थीनीने सांगितले.
काय म्हणाल्या विद्यार्थीनी दुसरे सर्व उपग्रह बद्दल लोक काम करू शकतात आम्ही सुध्दा हिंमत दाखवून उपग्रह तयार करण्याचे कार्य करून दाखविले असे उंदरणी गावच्या शेतमजूरी करणाऱ्या कुटुंबातील मयुरी पुसनाके या विद्यार्थिनीने सांगितले आहे. पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतंय त्याचा आनंद आहे आणि आता अजून उंच भरारी घ्यायची आहे असे शेतकरी कुटुंबातील साक्षी गेडाम हिने सांगितले. आज खैरगाव ,अर्ली, मोरवा,कारेगाव, जांब, टिटवी, उंदरणी या खेडेगावांना तसं फार कोणीच ओळखत नाही. मात्र आज आम्ही उपग्रह तयार केलेत. त्यामुळे आमच्या गावाकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र नक्की बदलणार आहे, असे पूजा तुमडाम या विद्यार्थिनीने सांगितले आहे.
काही महिन्यांपूर्वी या विद्यार्थ्यांनी इस्त्रोच्या निबंध स्पर्धामध्ये सुध्दा सहभाग घेतला होता. आज या विद्यार्थ्यांची कामगिरी त्यांच्यासाठी अंतरिक्ष तंत्रज्ञाची अनेक दालन खुले करणारी आहेत, असे असे रेड्डी कॉन्व्हेंट स्कूलचे अध्यक्ष सुरेश रेड्डी यांनी सांगितले आहे. या मुलींनी तयार केलेला उपग्रह आता 7 फेब्रुवारीला अवकाशात झेपावणार आहे त्याची उत्सुकता सर्वांना आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेली गगनभरारी आकाशाला गवसणी घालणारी आहे स्वप्नांना झेप देणारी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)