गुंगीचं औषध देऊन 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; नंतर विष देऊन पीडितेची हत्या
पारोळा तालुक्यातील एका वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसात दिली आहे.

जळगाव : वीस वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेत सदर तरुणीला विष पाजून मारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने मात्र संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करून तिच्यासह तिच्या तीन लहान भावंडांची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच ताजी असताना पारोळा तालुक्यातील एका वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसात दिली आहे. या घटनेत तरुणीचा विष बाधा होऊन मृत्यू झाल्याचे समोर आल्याने तिला विष पाजून मारण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून या विषयी अधिकचा आता पोलीस तपास करीत आहेत.
पारोळा तालुक्यातील रहिवासी असलेली वीस वर्षीय तरुणी आपली मामाकडे शिक्षणासाठी राहत होती. 7 नोव्हेंबरला औषधे आणण्यासाठी गेलेली ही तरुणी संध्याकाळ पर्यंत घरी परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसात हरवल्याची नोंद केली होती. पोलीस तिचा शोध घेत असताना पारोळा ग्रामीण रुग्णालयात विष बाधा झालेली एक तरुणी अॅडमिट झाल्याचं समोर आले होते. सदर तरुणीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तिला ओळखले,मात्र ती शुद्धीवर नव्हती. पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी तिला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. धुळ्याला घेऊन जात असताना सदर तरुणी काही वेळासाठी शुद्ध आली असतां तिने आपल्या परिचित असलेल्या तिघांनी गुंगीचे औषध पाजून रात्रभर सामूहिक अत्याचार केल्याचं नातेवाईकांना सांगितलं. त्यानंतर नातेवाईकांना पोलिसात फिर्याद दिली होती. आज पहाटे उपचारा दरम्यान या तरुणीचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी एका संशीयता व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
