Chhagan Bhujbal : दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला कोंडीत पकडणारा सवाल
Chhagan Bhujbal : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत काढण्यात आलेला लॉन्ग मार्च नाशिक येथे स्थगित करण्यात आला होता. यावेळी सुरेश धस यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

Chhagan Bhujbal : परभणीतील हिंसाचारानंतर (Parbhani Violence) न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत लॉन्ग मार्च काढण्यात आला. मात्र, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा लॉन्ग मार्च नाशिक (Nashik) येथे स्थगित करण्यात आला. नाशिक येथे लॉन्ग मार्चच्या आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या आमदार सुरेश धस यांचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यात सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही, असे वक्तव्य केले होते. आता यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यासह अनेकांनी सुरेश धस आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारला कोंडीत पकडणारा सवाल उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांनी आज सोमवारी (दि. 10) नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी छगन यांना सुरेश धस यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, संतोष देशमुख किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात एकच न्याय असावा. तो दलित समाजाचा आहे म्हणून वेगळा न्याय असे का? असा सवाल यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय. सर्वांना एकच न्याय असावा, यापुढेही अशीच मागणी कोणी करणार मग ते चालणार का? माणुसकी तरी असली पाहिजे, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
पालकमंत्रिपदाचा तिढा मुख्यमंत्री सोडवतील
नाशिक पालकमंत्रिपदावरून अजूनही रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही मागील कुंभमेळ्याच्या नियोजन बैठक घेतल्या होत्या. नाशिकमध्ये रिंगरोड तयार केले होते. नाशिकमधील घाट वाढवले होते. मंदिराची डागडुजी केली होती. नाशिकला विमानतळ तयार केले. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. कुंभमेळा येतोय यासाठी भारत सरकारकडे निधी मागा, असे मी त्यांना म्हटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार आहेत. सर्व मंडळी अनुभवी आहेत. पालकमंत्रिपदाचा तिढा मुख्यमंत्री सोडवतील, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा























