Sumangalam Lokotsav : कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाची सांगता; पर्यावरण रक्षण अन् सेंद्रीय शेतीचा जागर
पंचमहाभूत लोकोत्सवाची आज सांगता झाली. मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या अध्यक्षतेखाली या लोकोत्सवाची सांगता झाली.
Sumangalam Lokotsav : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (kaneri) मठावर (kolhapur News) सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाची (Sumangalam Lokotsav) आज सांगता झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या अध्यक्षतेखाली या लोकोत्सवाची सांगता झाली. गेल्या सात दिवसांपासून अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनात कणेरी मठावर हा पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा सुरू होता. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यासह इतर राज्यातील लाखो नागरिकांनी या सोहळ्यात उपस्थिती लावली. या महोत्सवातून पर्यावरण रक्षण तसेच सेंद्रीय शेतीचा जागर करण्यात आला.
दत्तात्रेय होसबाळे यांचे मार्गदर्शन
सांगता सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलताना दत्तात्रेय होसबाळे म्हणाले की, मनुष्याने निसर्गाशी हस्तक्षेप सुरू केला आहे. त्यामुळेच निसर्गाचे संतुलन बिघडून समस्या निर्माण होत आहे. भूकंपासारखे प्रकार घडण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपल्या जीवनशैली बाबत प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या पुढील पिढीला शुद्ध हवा, निरोगी जीवन द्यायचे असेल, तर या कार्यक्रमातून जाताना पंचमहाभूतांना वाचवले पाहिजे अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे. हा केवळ लोकोत्सव नाही, तर जीवनशैलीचा मार्गदर्शक आहे.
नारायण राणे काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगितले की, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण व्हावं यासाठी हा सोहळा मार्गदर्शक ठरणार आहे. गेल्या सात दिवसांमध्ये या ठिकाणी लाखो नागरिक येऊन गेले. इथं आलेला प्रत्येक माणूस काही ना काही चांगले शिकून बाहेर पडला आहे. कोकणात देखील गोशाळा निर्माण करण्याचा आपला विचार आहे. मी स्वतः तब्येत ठीक नसताना देखील केवळ या लोकोत्सवातून ऊर्जा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो.
नाहीतर एक दिवसही माती दगड होऊन बसेल
काडेसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी या लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आपण सर्वजण एखादी गोष्ट लगेच विसरून जातो. मात्र, आता तसं करून चालणार नाही. विनाशकाळ जवळ आला, तर आपण काळजी घेतली पाहिजे. पश्चिम घाटामध्ये देखील आता झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग करावा लागेल. नाहीतर एक दिवसही माती दगड होऊन बसेल. एका एकरामध्ये किमान 25 झाडे लावणे अपेक्षित आहे. आपलं गाव प्लास्टिक मुक्त कसं राहील याच्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. या लोकोत्सवातून प्रत्येकाने मार्गदर्शन घेऊन त्याचे अनुकरण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये करणे गरजेचे आहे. तरच या कार्यक्रमाचा हेतू सफल होईल.
इतर महत्वाच्या बातम्या