Jalna Rain: जालना जिल्ह्यात दोन दिवसांचा यलो अलर्ट जारी, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला असला तरी जालना जिल्ह्यात मात्र अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्रकल्प कोरडे पडले असून, पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
जालना : मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना (Jalna News) जिल्हयात 2 व 3 ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे, जिल्ह्यात या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच ताशी 30 ते 40 कि.मी. प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच 4 आणि 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधीत यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, खबरदारीची उपाययोजना म्हणून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 43 टँकरने पाणीपुरवठा!
मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला असला तरी जालना जिल्ह्यात मात्र अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्रकल्प कोरडे पडले असून, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील 37 गावं आणि 18 वाड्यांसाठी भर पावसाळ्यात 43 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे यासाठी 41 विहिरी अधिग्रहण करण्यात आले आहे. तर, जिल्ह्यातील 64 पैकी तब्बल 46 प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली असून, उर्वरित 18 प्रकल्पांत केवळ 8.62 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊस
- जालना : 41.05 टक्के
- बदनापूर : 42.26 टक्के
- भोकरदन : 46.17 टक्के
- जाफराबाद : 50.57 टक्के
- परतुर : 30.72 टक्के
- मंठा : 33.70 टक्के
- अंबड : 46.60 टक्के
- घनसावंगी : 36.18
जिल्ह्यातील प्रकल्पांची परिस्थिती
- कल्याण गिरजा : 45.92 टक्के
- कल्याण मध्यम : 43.86 टक्के
- अप्पर दुधना : 40 टक्के
- जुई मध्यम : 0.50 टक्के
- धामना मध्यम : 12.10 टक्के
- जीवरेखा मध्यम : 15.50 टक्के
- गल्हाटी मध्यम : 00 टक्के
पावसाळ्यात हे करा!
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
पावसाळ्यात हे करू नका!
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) केशव नेटके यांनी केले आहे.