संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Sanjay Raut : हिंदूंवरील अत्याचाराला भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
मुंबई : हिंदूंवरील अत्याचाराला भाजपा (BJP), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. आता यावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार दादा भुसे (Dada Bhuse) यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांना आता हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सध्या दिल्लीत संसदीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावरून भाजपला टार्गेट केले जात आहे. बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचारानंतर विरोधी पक्षाकडून भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना चांगलेच धारेवर धरले जात आहे. तर हिंदुत्व आणि हिंदूंचा भाजपाने निवडणुकीत वापर केला, असा आरोपदेखील केला जात असून यावरूनच संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला.
राऊतांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार आहे का?
संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर दादा भुसे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. संजय राऊतांनी जी काही थोडी राहिली आहे, ती संभाळावी. दुसर्याच्या घरात डोकावू नये. संजय राऊतांविषयी फार बोलून मला त्यांना महत्व द्यायचं नाही. कदाचित संजय राऊताचं डोकं त्या ठिकाणी तसं चाललं नसतं तर शिवसेनेला हा दिवस बघायला मिळाला नसता. लोकसभेत जागा कमी झाल्या, विधानसभेला २० जागा मिळाल्या त्याचं आत्मचिंतन करण्याची राऊतांना गरज आहे. त्यावर वेळ न घालवता राऊत वेड वाकडं बोलतात. आज ते हिंदुत्वावर बोलत होते. मला हसू आलं, खरंच राऊतांना आता हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार आहे का? असा सवाल दादा भुसे यांनी उपस्थित केला.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
जगातला हिंदू संकटात आहे तो फक्त मोदी, शाह आणि भाजप यांच्या स्वार्थामुळेच. सुप्रीम कोर्टाने याला फूस लावली. देशात निवडणुका जिंकण्यासाठी जी ठिणगी भाजपने टाकली, त्याचा परिणाम जगात हिंदू ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणावर आहे तिथे होत आहे. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान या ठिकाणी हिंदूंवर हल्ले होत आहेत. याला जबाबदार नरेंद्र मोदी यांचे धोरण आहेत. निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणे याला जबाबदार आहेत. भारतात सातत्याने दंगे घडवायचे आणि मुसलमानांना टार्गेट करायचे. प्रार्थना स्थळे खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. आता याचा परिणाम इतर देशातील हिंदूंवर होत आहे. मोदींच्या सरकारमध्ये एवढी ताकद नाही की, ते बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवतील. नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित असण्याला जबाबदार आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला होता.
आणखी वाचा
Sanjay Raut : भाजपने ठरवलं तर एका मिनिटांत मागण्या करणार्याला चिरडतील; संजय राऊत यांची बोचरी टीका