Tejinder Bagga in High Court: तेजिंदर बग्गा यांना दिलासा, 10 मे पर्यंत बग्गा यांच्याविरोधात कठोर पाऊल न उचलण्याचे न्यायालयाचे निर्देश
भाजपचे नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्याविरोधात कोणतेही कठोर पाऊल उचलू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शनिवारी रात्री उशीरा यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.
Tejinder Bagga in High Court : पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने भाजपचे नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्याविरोधात कोणतेही कठोर पाऊल उचलू नये असे निर्देश दिले आहेत. शनिवारी रात्री उशीरा यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीतील एका भाजपच्या नेत्याने दिवशी मोहाली न्यायालयात तेजिंदर बग्गा यांच्या अटक वॉरंटला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती अनूप चितकारा यांनी बग्गा यांच्या याचिकेवर रात्री उशिरा सुनावणी घेतली.
दरम्यान, बग्गा यांचे वकील चेतन मित्तल यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत बोलताना सांगितले की, 10 मे पर्यंत बग्गा यांच्याविरोधात कोणतेही कठोर पाऊल उचलण्यात येणार नसल्याचे सांगितले. न्यायालयाने अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे. शनिवारी रात्री 45 मिनिटे याबाबत सुनावणी चालली. त्यानंतर निर्णय देण्यात आल्याची माहिती वकील चेतन मित्तल यांनी दिली. न्यायदंडाधिकारी रवेश इंद्रजीत सिंग यांच्या न्यायालयाने गेल्या महिन्यात दाखल झालेल्या एका प्रकरणात बग्गाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. पंजाब पोलिसांनी तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्याविरुद्ध प्रक्षोभक विधाने करणे, शत्रुत्व वाढवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे यासाठी गुन्हा दाखल केला होता. मोहालीचे मूळ रहिवासी असलेले आम आदमी पार्टीचे नेते सनी अहलुवालिया यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इकबाल सिंह यांचे पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र
भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना दिल्लीतून अटक करताना पंजाबच्या पोलिसांनी पगडी बांधू दिली नाही. तसेच त्यांच्या वडिलांनाही मारहाण केली असल्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा यांनी म्हटले आहे. या प्रकरणाबाबत इकबाल सिंह यांनी पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून 7 दिवसांमध्ये अहवाल मागवला आहे.
या कलमान्वये बग्गा यांच्यावर गुन्हा दाखल
1 एप्रिलला बग्गा यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये त्यांच्या 30 मार्चच्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले होते, यावेळी बग्गाही यामध्ये सामील होते. तसेच तेजिंदर बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केले होते. बग्गा यांच्या ट्वीटमुळे समाजात तेढ निर्माण होण्याचा आरोप करत मोहालीत सायबर गुन्हे विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम 153-ए, 505 आणि 506 अंतर्गत बग्गा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाब पोलिसांनी शुक्रवारी बग्गा यांना त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरातून अटक केली. मात्र, बग्गाला पंजाबला घेऊन जाणाऱ्या पोलिसांना हरियाणामध्ये रोखण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना दिल्लीत परत आणले होते.
महत्त्वाच्या बातम्या: