Weekly Recap : ओडिशामध्ये रेल्वे अपघात, दहावीचा निकाल, शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी आणि पालख्यांची लगबग; या आठवड्यातील लक्षवेधी घडामोडी
Weekly Recap : या आठवड्यात 29 मे ते 4 जून दरम्यान राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पाहुयात या बातम्यांचा आढावा.
India This Week: सरत्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही दिलासा देणाऱ्या तर काही अंगावर शहारे आणणाऱ्या. काही थरकाप उडवणाऱ्या तर काही आनंद देणाऱ्या. खरंतर सरता आठवडा इतर घडामोडींसोबतच राजकीय घडामोडींना गाजला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तपणे घेऊन आलोय...
ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू, 900 जण जखमी
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघात झाला, यामध्ये 288 शांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या सुमाराला ही दुर्घटना घडली. हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र काही क्षणांतच या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी ट्रेन धडकली, आणि मग मृत्यूचं तांडवच सुरू झालं. शोध आणि बचावकार्य दुपारी १२च्या सुमाराला संपलं. NDRFच्या 9 तुकड्या घटनास्थळी आहेत, तसंच सैन्य दलालाही पाचारण करण्यात आलं आहे. (वाचा सविस्तर)
दहावीचा निकाल घसरला, राज्याचा निकाल 93.83 टक्के, नागपूरचा निकाल सर्वात कमी
या आठवड्यात दहावीचा निकाल लागला. राज्याचा दहावीचा निकाल हा 93.83 टक्के इतका आहे. तर त्यात फेरपरीक्षार्थी म्हणजेच रीपिटर्सचं प्रमाण 60% टक्के आहे. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला होता. यावर्षी राज्य बोर्डाच्या वेगवेगळ्या विभागात कोकणाने बाजी मारली आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल 98.11% आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जास्त आहे. यावर्षी 43 शाळांचा निकाल शून्य टक्के तर 29 शाळांचा निकाल 100% आहे. (वाचा सविस्तर)
मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
रयतेच्या राजाचं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे. तिथीनुसार 2 जून रोजी तर तारखेनुसार 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. दुर्गराज रायगडावर सर्व जय्यत तयारी झाली आहे. खारघर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पावलागणिक काळजी घेतली जात आहे. पायथ्यापासून गडावर जाताना प्रत्येक पाचशे मीटरवर सुसज्ज वैद्यकीय मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गराज रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळ्याला उपस्थिती लावली. गडावरील कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजाचं नाव देण्याची घोषणा केली.
आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनाचं निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत (वाचा सविस्तर)
आषाढी वारीसाठी टोलमाफी! चोख नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
जून महिना हा जसा पावसाच्या आगमनाचा तसा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीचा.. वेगवेगळ्या संताच्या तसंच देवस्थानाच्या पालख्या हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं एक अद्वितीय वैशिष्ट्य.. गावोगावी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांची लगबग सुरु आहे. सर्वाधिक आकर्षणाच्या पालख्या म्हणून देहू आळंदीच्या पालख्यांचा मान असला तरी, विदर्भातून दोन मोठ्या पालख्या पंढरपूरला निघण्यासाठी सर्वात आधी प्रस्थान ठेवतात. त्यातील एक शेगावच्या संत गजानन महाराजांची तर दुसरी रुक्मिणीमाईच्या माहेरची म्हणजे अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूरची पालखी.. या दोन्ही पालख्यांचा प्रवास मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुरु होतो. तर संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी मुक्ताईच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील अंकलीच्या शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वाचंही आळंदीकडे प्रस्थान झालं. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे महाराष्ट्र सरकारने यावर्षीही सर्व मार्गावरुन पंढरपूरकडे येणाऱ्या पालख्यांना टोलमाफी करण्याचे आदेश जारी केले आहेत. (वाचा सविस्तर)
सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी ड्रेसकोड लागू नाही, मंदिर प्रशासनाचे स्पष्टीकरण, भाविकांचे म्हणणं काय?
तुळजाभवानीच्या तुळजाभवानीच्या मंदिर समितीच्या फतव्याने. मात्र तासाभरातच तुळजाभवानी देवस्थान समितीने हा निर्णय मागे घेतला. त्यानंतर मात्र राज्यातील वेगवेगळ्या मंदिरांच्या समितीने असे प्रस्ताव संमत केले. त्यात नागपूर, पुणे, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणच्या मंदिरांचा समावेश आहे. राज्यातील तब्बल 300 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याचा निर्धार मंदिर महासंघाने व्यक्त केलाय. तुळजापूरप्रमाणेच देवीच्या शक्तीपीठापैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवस्थानाने मात्र ग्रामपंचायतीचा ठराव असतानाही ड्रेसकोड लागू करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. (वाचा सविस्तर)
व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घट
व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घट झालीये.. 83.5 रुपयांनी सिलेंडर स्वस्त झालाय. यामुळे मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर 1,725 वर गेलाय. याआधी मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर हा 1808 रुपये इतका होता. तर एप्रिल महिन्यात हाच दर 1980 रुपये इतका होता तसंच या स्वस्त झालेल्या किंमतींमुळे हॉटेल व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळालाय. ( वाचा सविस्तर)
चेन्नई पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन; 2008 पासून कोणत्या संघानं पटकावलं विजेतेपद, जाणून घ्या सविस्तर
इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या मोसमाचा विजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ ठरला आहे. चेन्नई संघानं गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करत पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याची कामगिरी करत मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरुवातीपासून ते अंतिम सामन्यापर्यंत अतिशय रोमांचक ठरला. अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत चेन्नई आयपीएल 2023 चा विजेता ठरला. (वाचा सविस्तर)
कुस्तीपटूंचा गंगेत पदकं विसर्जित करण्याचा निर्णय मागे; शेतकरी नेत्यांनी काढली कुस्तीपटूंची समजूत
भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sigh) यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी (wrestlers) गंगेत पदकं विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. शेतकरी नेत्यांनी कुस्तीपटूंची समजूत काढल्यानंतर गंगा तिरावरुन सर्व कुस्तीपटू मागे परतले . कुस्तीपटूंनी शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्याकडे सर्व पदक सोपवले (वाचा सविस्तर)