Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Maharashtra Vidhansabha Result: नाशिक शहरातील प्रत्येक उमेदवारांच्या कार्यालय आणि निवासस्थानाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता गावागावात आणि राज्यातील 288 मतदारसंघात आहे. त्यामुळे, आपल्या पक्षाच्या नेत्याचं काय होणार, आपला उमेदवार विजयी होणार की नाही, यावरुन गावखेड्यात, वाड्यावस्तीत चर्चा रंगल्या आहेत. अनेक ठिकाणी आपलाच उमेदवार विजयी होईल, अशा आशयाचे बॅनरही लागले आहेत. तर, कार्यकर्त्यांनी, मित्रांनी पैजा लावत आपला आत्मविश्वास व्यक्त केलाय. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, निकालानंतर मोठा जल्लोष करायचा आणि मिरवणूक काढायची याचं नियोजन सर्वच मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून, नेतेमंडळींकडून सुरू आहे. मात्र, नाशिक (Nashik) शहरात निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास पोलीस (Police) प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.
नाशिक शहरातील प्रत्येक उमेदवारांच्या कार्यालय आणि निवासस्थानाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात नाशिक शहर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. त्यासाठी, मोठ्या प्रमाणात फौजफाटा नाशिक शहरात दाखल झाला आहे. नाशिक शहरात विविध ठिकाणच्या चार ठिकाणी मतमोजणी होणार आहे. नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम आणि इगतपुरी ह्या चार मतदारसंघाची मतमोजणी शहरातील विविध ठिकाणी होणार आहे. त्यामुळे, शहरात वरिष्ठ अधिकारी, पोलिस निरीक्षकांसह हजारो पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, निकालानंतर शहारातील वातावरण शांततामय राहण्यासाठी पोलिसांचा तगडा पाहारा असणार आहे.
नाशिक शहरात मतमोजणी केंद्राच्या बाहेर नाशिक शहर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त असणार असून उद्या नाशिक शहरातील चार विधानसभा मतदार संघाचा निकाल जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने नाशिक शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. या सदर्भात पोलीस उपयुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी, शहरात उद्या निवडणूक निकालानंतर रॅली किंवा मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे, नाशिक शहरातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला व आनंदाला काहीसा ब्रेक मिळणार आहे. त्यामुळे, निकालानंतर उमेदवाराच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गुलाल उधळा, पण डिजे वाजयवायला परवानगी नाहीच. दरम्यान, राज्यातील 288 मतदारसंघातील निवडणुकांसाठी उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी लक्षात घेत मतदारसंघात निकालाच्या फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST