Karuna Sharma on Dhananjay Munde : घरच्या नोकराकडे चार-चार हजार कोटीची प्रॉपर्टी, पण स्वतःच्या बायकोसाठी धनंजय मुंडेंकडे दोन लाख रुपये सुद्धा नाहीत; करुणा शर्मांचा हल्लाबोल
Karuna Sharma on Dhananjay Munde : करूणा शर्मा यांना 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने दिले होते. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आव्हानात्मक याचिका दाखल केली आहे.

Karuna Sharma on Dhananjay Munde : घरगुती हिंसाचाराच्या आरोपाप्रकरणी दोषी ठरवून पहिल्या पत्नीला महिना देखभाल खर्च देण्याच्या वांद्रे दंडाधिकाऱ्यांच्या अंतरिम आदेशाला माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली पहिली पत्नी असल्याचा दावा करूणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याकडून केला जात असला तरी, आपला त्यांच्याशी कधीच विवाह झाला नव्हता या दाव्याचा धनंजय मुंडे यांनी अपिलात पुनरूच्चार केला आहे. या प्रकरणावरून करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
करुणा शर्मा म्हणाल्या की, न्यायाधीश साहेबांनी पहिली बायको म्हणून मला पोटगी देण्याचे मान्य केले होते,ऑर्डर दिली होती. माझा नवरा धनंजय मुंडे आम्हाला दोन लाख द्यायला तयार नाही, त्यासाठी त्यांनी पिटीशन टाकले आहे. त्यावर आज सुनावणी आहे. घरच्या नोकराकडे चार-चार हजार कोटीची प्रॉपर्टी आहे. पण स्वतःच्या बायकोसाठी 27 वर्षे ज्यांनी आपले अस्तित्व लपवून ठेवले, त्या धनंजय मुंडेंकडे तिच्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडे दोन लाख रुपये सुद्धा नाहीत. मला न्यायाधीश साहेबांवर आणि न्यायालयावर शंभर टक्के विश्वास आहे. मला शंभर टक्के न्याय भेटणार आहे, असे त्यांनी म्हटले.
सगळे मंत्री नोकरांच्या नावावर प्रॉपर्टी करतात
करुणा शर्मा पुढे म्हणाल्या की, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, न्यायालय पूर्ण पुराव्यावर चालते. सगळे मंत्री लोक आपले नोकर-चाकर यांच्या नावावर प्रॉपर्टी करत असतात. त्यांना कुठे अडकायचं नसते. मी त्यांची बायको आहे. माझ्या नावावर त्यांनी काही घेतलं नाही. मी शंभर टक्के त्यांची बायको होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
पूजा चव्हाणलाही न्याय मिळाला पाहिजे
दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. याबाबत विचारले असता करुणा शर्मा म्हणाल्या की, दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे. जसं दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, तसा पूजा चव्हाणला पण न्याय मिळाला पाहिजे. पूजा चव्हाणचे सर्व पुरावे मीडियाकडे आहेत. तिचा पण मर्डर करण्यात आला तिला पण न्याय मिळाला पाहिजे. पूजा चव्हाणचा मर्डर झाला, तेव्हा ती प्रेग्नेंट होती. त्यावेळेस संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता. पण, हा मुद्दा शांत झाल्यानंतर ते आता मंत्री आहे. सत्तेचा गैरवापर करणारे लोक सत्तेमध्ये नको, असे त्यांनी म्हटले.
धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 29 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. करूणा शर्मा प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेकडून सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. करुणा शर्मा यांनी आपलं उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. पुढच्या सुनावणीत करुणा शर्मा यांच्या वतीनं युक्तिवाद केला जाणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

