Devendra Fadnavis : नागपूर हिंसाचारात सोशल मीडिया पोस्ट ट्रॅकिंग कमी पडलं; माझा महाराष्ट्र माझं व्हिजन मध्ये CM देवेंद्र फडणविसांनी सगळंच सांगितलं!
Devendra Fadnavis Majha Maharashtra Majha Vision: एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Devendra Fadnavis on Nagpur Violance : नागपूर हिंसाचार प्रकरणात (Nagpur Violance Case) इंटेलिजन्स यंत्रणा अपयशी ठरली असे म्हणता येणार नाही. पण दुपारनंतर ज्या पद्धतीने सोशल मीडिया ट्रॅक व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. नागपुरात (Nagpur) जो हिंसाचार झाला, जे वातावरण निर्माण करण्यात आलं, ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच करण्यात आलं. आपल्याकडे परिपूर्ण यंत्रणा आहे. मात्र ती वापरण्याची सवय आता आपल्याला करावी लागणार आहे. कारण व्यक्तिगत बैठका घेणं हे आता दुरापास्त झाले असून बहुतांश गोष्टी सोशल मीडियाच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच होत असतात. त्यामुळे त्या संदर्भात दुपारीच सोशल मीडिया योग्य पद्धतीने ट्रॅक केला असता तर कदाचित ही घटना घडली नसती, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणावर भाष्य केलं. ते एबीपी माझाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझा महाराष्ट्र माझा, माझं व्हिजन (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत आपले मत मांडले.
सोशल मीडिया नीट ट्रॅक केला असता तर हिंसाचार टळला असता : देवेंद्र फडणवीस
नागपुरात घटना घडली त्यावेळी पोलिसांनी गल्लीबोळात जाऊन या दंगेखोरांवर कारवाई केली. त्यामुळे मोठी दंगल उसळली नाही. घटनेवेळी यांची संख्या जास्त होती अशी ही नाही मात्र त्यांची मानसिकता मात्र दिसून येत होती. यातून हे लोक आपल्या समाजालाही बदनाम करत आहे आणि समाजातील सलोकाही बिघडवत आहे. त्यामुळे पोलिसांचे काम हे अचूक राहिले आहे. ते कुठेही कमी पडले नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर हिंसाचार प्रकरणावर अनेकांनी आरोप करत पोलीस या प्रकरणावर ताबा मिळवण्यातदिरंगाई केली, यंत्रणा अपयशी ठरली असे आरोप विरोधकांसह सत्तेतील आमदार प्रवीण लटके यांच्याकडून करण्यात आले होते. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मूठभर लोकांमुळे नागपूरचं नाव खराब,1992 नंतर पहिल्यांदाच तणाव : मुख्यमंत्री
मुठभर लोकांच्या कृत्यामुळे कुठेतरी नागपूर शहराचे नाव खराब झाले आहे. गेल्या इतक्या वर्षांच्या राजकारणात 1992 नंतर प्रथमच नागपुरात अशा पद्धतीचा तणाव दिसला. यात दोन गोष्टी महत्वाच्या मानायला हव्यात, त्यात एका म्हणजे नागपूर शहरातील जी काही सांस्कृती आहे त्यामुळे या प्रकरणावर लवकर नियंत्रण मिळवता आले. परिणामी हे प्रकरण फार दिवस चिघळले नाही. मात्र जे काही घडलं ते योग्य नाही. खरं तर जे काही सकाळी आंदोलन झालं त्यात औरंगजेबाची कबर जाळण्यात आली. त्यानंतर दुपारच्या दरम्यान काही लोकांनी वेगवेगळ्या समाज माध्यमांवर अफवा पसरवल्या. त्यातून असं सांगण्यात आलं की औरंगजेबाच्या कबरीला जी चादर गुंडाळण्यात आली त्यावर कुठेतरी कुराणामधील आयाती लिहिल्या होत्या. मात्र आपण जर त्यातले दृश्य बघितले तर त्यात कुठेही असे दिसून आलेलं नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने पोस्ट करून लोकांच्या भावना भडकवण्यात आल्या.
कालांतराने संध्याकाळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला आणि त्यांनी जाळपोळ, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली. शिवाय पोलिसांवरही हल्ला केला. दुर्दैवानं यातील काही लोकांनी, हे ठरवून घडवून आणलं. यात ठराविक आस्थापनांना टारगेट करणे, गच्चीवर परिसरात दगडी जमा करून ठेवणे. अशा प्रकारे काम करण्यात आलं. सोबतच या सगळ्यात जास्त हल्ला हा पोलिसांवरच करण्यात आला मात्र पोलिसांनी बेधडकपणे गल्लीबोळात शिरून या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र यात अनेक पोलीस अधिकारीही मोठ्या प्रमाणात जखमी झाले.
पोलिसांच्या वर्दीवर हात टाकणारे हे लोक कोण आहेत? यांचा हेतू काय, त्याचा तपास केला असता त्यामागे अनेक गोष्टी उलगडत आहेत. त्यातील एक मास्टर माईंड हा मालेगावचा आढळून आला आहे. तो नागपुरात येऊन काय करत होता? अनेक पैलू आता तपासातून पुढे येणार आहे. मात्र या सगळ्यांमध्ये ज्यांनी नागपूरचा स्वास्थ बिघडवलं त्यांना कदापि सोडणार नाही असा सज्जड दम देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
हिंसाचार करणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नाही
संपूर्ण प्रकरणात आम्ही बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र हिंसाचार करणाऱ्या कुणालाही या प्रकरणातून सोडले जाणार नाही. पोलिसांवर हल्ला करणे हे अतिशय गंभीर बाब असून अशा हल्लेखोरांना जर सोडलं तर हे कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने योग्य नाही. परिणामी त्यांना अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

